मुक्तपीठ टीम
गडचिरोलीमध्ये वाघाच्या हल्ल्यात १७ माणसांनी तर ५००पेक्षा जास्त जनावरांनी जीव गमावला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या वाघाच्या शोधासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स जंगलाच्या अनेक भागात शोध मोहीम राबवत आहेत.स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सकडून कॅमेरा ट्रॅप, स्थानिक लोकांच्या मदतीने वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सतरा जणांचा मृत्यू झाल्याने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या प्रयत्नांमध्ये पावसाचाही अडथळा
- सततचा पाऊस वाघाच्या शोधासाठीही समस्या निर्माण करत आहे.
- सध्याच्या परिस्थितीत १७ लोकांचा बळी घेणारा वाघ शोधणे खूप कठीण आहे.
- १५० हून अधिक कॅमेरे सेटअप करण्यात आले आहेत.
- स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स सतत लक्षण ठेवत आहे.
- दररोज जंगलात ४० किमी पेक्षा जास्त पायी प्रवास करुन शोध घेतला जात आहे.
- गावकऱ्यांमध्ये नरभक्षक वाघामुळे प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला जेरबंद करा – एकनाथ शिंदे
गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शिंदे यांनी बैठकीत दिले. यासाठी ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेण्याचे निर्देश शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाने केलेल्या हल्ल्यात १७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५०० हुन अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाकडून या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही हा वाघ सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.
‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ च्या चमूत पशु वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बायोलॉजिस्ट अशा तज्ञ व्यक्तींचा समावेश असून त्यांच्या माध्यमातून या वाघाचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाय करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य वन संरक्षक अधिकारी मानकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.