मुक्तपीठ टीम
कोरोनाचा संसर्ग संपूर्ण भारतात आता कमी झाला आहे. सर्व ठिकाणांहून थोडेफार निर्बंध हटवण्यात आले आहेत. प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहांमध्ये दोन वर्षांनंतर पुन्हा पाहायला मिळत आहे. नुकताच आलेला ‘द कश्मीर फाइल्स’जबरदस्त हीट झाला. तर सध्याच्या घडीला ‘आरआरआर’ या चित्रपटाने ही बाजी मारलेली आहे. या चित्रपटाने २०० कोटींचे नेट कलेक्शन केल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते दिग्दर्शक चक्क झाले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आपले अस्तित्व कायम ठेवले आहे आणि आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ६६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘आरआरआर’ चित्रपटाला किती यश मिळेल, हे चित्रपटाच्या तिसऱ्या वीकेंडच्या कमाईवर अवलंबून असेल. चित्रपटाच्या कमाईसाठी आता फक्त एक आठवडा बाकी आहे कारण, येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर ‘बीस्ट’, ‘केजीएफ २’ आणि ‘जर्सी’ हे चित्रपट झळकणार आहेत. त्यामुळे या आठवड्यानंतर संघर्षमय वातावरण सुरू होईल. या संघर्षात ‘आरआरआर’ चित्रपटाच्या कमाईवर अधिक परिणाम पाहायला मिळणार आहे.
‘आरआरआर’ चित्रपटाची सर्वत्र होणारी प्रसिद्धी
- ‘आरआरआर’ चित्रपटाने रिलीजच्या १३व्या दिवशी २०० कोटी रुपयांचा नेट कलेक्शनचा टप्पा ओलांडला.
- या चित्रपटाने ग्रॉस कलेक्शनमध्ये याआधीच हा आकडा गाठला होता.
- रिलीजच्या १४व्या दिवशीही हा चित्रपट दुहेरी आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे.
- तिसरा वीकेंड ‘आरआरआर’ चित्रपटासाठी चांगला जाणार आहे.
‘आरआरआर’ चित्रपटाने रिलीजच्या १३ व्या दिवशी तब्बल १२ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये हिंदी व्हर्जनचे सुमारे पाच कोटी रुपये असून तेलुगू व्हर्जनचे योगदान सुमारे तीन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे संकलनाचे प्रारंभिक आकडे आहेत आणि अंतिम आकड्यांनंतर थोडासा फरक शक्य आहे. ‘आरआरआर’ चित्रपटाने २०० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन गाठल्याने, असे करणारा हा देशातील हिंदीत प्रदर्शित झालेला २६वा चित्रपट ठरला आहे. कोरोना महामारीनंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ नंतरचा हा दुसरा चित्रपट आहे. कोरोना महामारीच्या अगदी आधी अजय देवगणच्या ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने हे यश मिळवले होते.
प्रेक्षक आणि व्यापाराच्या नजराही चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनवर
- जगभरातील कमाईचा विचार करता या चित्रपटाने आतापर्यंत ९६० कोटींची कमाई केली आहे.
- तिसऱ्या वीकेंडमध्ये या चित्रपटाशी कोणत्याही इतर चित्रपटाची स्पर्धा झाली नाही तर हा चित्रपट १ हजार कोटी रुपयांचा टप्पा सहज गाठेल अशी आशा निर्मात्यांना आहे.
- ‘आरआरआर’ या चित्रपटाने आतापर्यंत देशात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा किताब आधीच पटकावला आहे.