मुक्तपीठ टीम
सरकारने कार निर्मात्यांना कारमधील सर्व प्रवाशांसाठी ‘थ्री-पॉइंट’ सीट बेल्ट देणे बंधनकारक केले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे वाहन प्रवाशी सुरक्षेसाठी खूप आग्रही असतात. त्यांच्याच प्रयत्नांमुळे हा नवा नियम लागू झाला आहे. गडकरी यांनीच ही माहिती दिली आहे. गाडीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या मधल्या प्रवाशासाठीही हा नियम लागू असेल, असे ते म्हणाले. कार कंपन्यांना मधल्या प्रवाशांसाठीही तीन-पॉइंट सीट बेल्ट देखील द्यावे लागतील.
परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “ही तरतूद असलेल्या फाईलवर मी सही केली आहे. याअंतर्गत कार कंपन्यांना वाहनात बसणाऱ्या सर्व प्रवाशांना तीन पॉइंट सीट बेल्ट देणे बंधनकारक करण्यात आले आहे, आणि ते देणे आवश्यक आहे.”
आताच्या, चारचाकी वाहनांमध्ये पुढील दोन्ही सीटसाठी आणि फक्त मागील दोन सीटसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट दिले जातात. दुसरीकडे, मागील मधल्या सीटसाठी फक्त दोन-पॉइंट सीट बेल्ट येतात. गडकरी म्हणाले की, देशभरात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यामुळेच लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सीट बेल्टची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.