मुक्तपीठ टीम
गेल्या २४ तासांत मुंबई शहरात तीन हत्येच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. या तिन्ही घटना गोरेगाव, मुसाफिरखाना आणि माटुंगा परिसरात घडल्या. हत्या झालेल्या तिघांमध्ये एका तरुणासह महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी शाहूनगर, आरे आणि माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी स्वतंत्र हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करुन आरोपींना गजाआड केले आहे. अटकेनंतर या सर्व आरोपींना बोरिवली, वांद्रे आणि किल्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पहिली घटना गोरेगाव परिसरात घडली.
गोरेगाव येथील आरे कॉलनीजवळ एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती गुरुवारी सकाळी आरे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली होती, घटनास्थळी पोलिसांना एक ४० वर्षांची महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले, तिला तातडीने पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. चौकशीअंती मृत महिलेचे नाव शहनाज गंभीर शेख ऊर्फ सातारु जानू सुतार असल्याचे उघडकीस आले.
शहनाज ही आरे कॉलनीतील गौतमनगर परिसरात राहत होती. याप्रकरणी आरे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती, तपासात तिचे सुरजकुमार रामभूज मौर्या या २५ वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांच्या विशेष पथकाने काही तासात सुरजकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीत त्याने त्याचे शहनाजसोबत प्रेमसंबंध होते, ती त्याच्याकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होती, त्यातून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती, दोन दिवसांपूर्वी सुरजकुमार हा मद्यप्राशन करुन आरे कॉलनीत गेला होता, यावेळी त्यांच्यात लग्नावरुन पुन्हा कडाक्याचे भांडण झाले होते, त्यातून रागाच्या भरात त्याने लोखंडी पाण्याच्या पाईपने शहनाजची बेदम मारहाण करुन हत्या केली, या हत्येनंतर तो प्रचंड घाबरला आणि तेथून पळून गेला होता, अखेर त्याला गुन्हा दाखल होताच काही तासांत आरे पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.
दुसरी घटना गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता तो एस. एस मुखाफिरखाना रोड, मशिदीजवळील शौकत स्टोअर, शॉप क्रमांक तीनसमोर घडली. याच परिसरात जमाल हुसैन इक्बालउद्दीन शेख हा तरुण फळ विक्रीचा व्यवसाय करीत होता, दिवसा काम केल्यानंतर रात्री मिळेल त्या ठिकाणी जमाल हा झोपत होता, गुरुवारी सकाळी आठ वाजता तिथे आसिफ नावाचा एक भुरटा चोर आला होता, त्याने त्याचा मोबाईल चोरीचा प्रयत्न केला, हा प्रकार जमालच्या लक्षात येताच त्याने त्याला पकडून बेदम मारहाण केली होती. काही वेळानंतर त्याने लाकडी बांबूने त्याच्या डोक्यात मारहाण केल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता, हा प्रकार स्थानिक लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या आसिफला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग तुकाराम बांदल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी जमाल शेखविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता, गुन्हा दाखल होताच त्याल पोलिसांनी अटक केली. मृत आसिफ हा भुरटा चोर असून त्याच्याविरुद्ध अनेक चोरीचे गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिसरी घटना माटुंगा परिसरात घडली. युसूफ चौधरी हे माटुंगा येथील लेबर कॅम्प परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून अक्रम युसूफ चौधरी हा त्यांचा २६ वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी रात्री दहा वाजता अक्रम हा त्याचा मित्र तुफैलसोबत बिजागरी आणण्यासाठी बाहेर गेला होता, बिजागरी घेतल्यानंतर तो त्याच्या घराच्या दिशेने जात होता. यावेळी गटार गल्ली, रत्नमहल टॉवर मेन गेटजवळील, लेबर कॅम्प, माटुंगा परिसरात त्याला त्याचे भावोजी अमन सिकंदर शेख व त्याचा मित्र इजाज इम्तियाज शेख हे भेटले, काही कळण्यापूर्वीच या दोघांनी त्यांच्याकडील चाकूने अक्रमवर वार केले होते. त्यात तो रक्तबंबाळ झाला होता, जमिनीवर कोसळताच ते दोघेही तेथून पळून गेले होते, तुफैलकडून ही माहिती मिळताच युसूफ चौधरी व इतर स्थानिक रहिवाशांनी रक्तबंबाळ झालेल्या अक्रमला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी युसूफ चौधरी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अमन शेख आणि इजाज शेख यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता, गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता, ही शोधमोहीम सुरु असतानाच रात्री उशिर इजाज शेख याला पोलिसांनी अटक केली.
चौकशीत अक्रम आणि अमन हे नातेवाईक असल्याचे उघडकीस आले, अमनची बहिण लना हिच्यासोबत अक्रमचे प्रेमसंबंध होते, याच प्रेमसंबंधातून त्याने तिचे अपहरण केले, त्यानंतर त्यांनी वांद्रे येथे कोर्ट मॅरेज केले होते, त्याचा अमनच्या मनात राग होता, त्यातून त्याने इजाजच्या मदतीने त्याच्या हत्येची योजना बनविली होती, ठरल्याप्रमाणे गुरुवारी रात्री ते तिथे आले आणि त्यांनी अक्रमवर तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. पळून गेलेल्या इजाजला पोलिसांनी अटक केली तर अमन शेखचा आता पोलीस शोध घेत आहेत, लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी सांगितले. अटकेनंतर या सर्व आरोपींना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.