शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई बडे यांना गोळ्या झाडून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीसह चार आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी आहेत.
सद्दाम ऊर्फ मच्छी मुस्ताक हाश्मी, फैयाज नूरमोहम्मद सिद्धीकी, राशिद अख्तर सोहेब खान ऊर्फ राशिद कान्या आणि अक्तर कमरुल खान अशी या चौघांची नावे आहेत, अटकेनंतर या चौघांना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांनी दुजोरा दिला आहे. ३ जानेवारी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात स्थानिक पोलिसांकडून ऑपरेशन क्लीन अप सुरु करण्यात आले होते, त्यात पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करणे, अवैध धंद्यावर कारवाई करणे, पाहिजे आरोपींचा शोध घेणे आदी मोहीम सुरु करण्यात आली होती. ही कारवाई सुरु असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुंडाविरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस शिपाई बडे यांना सद्दाम हाश्मीने फोन केला होता, ही कारवाई तातडीने थांबवा, नाहीतर गोळ्या झाडून जिवे मारण्याची त्याने त्यांना धमकी दिली होती.
या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सद्दामसह त्याच्या सहकार्यांचा शोध सुरु केला होता, ही शोधमोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री उशिरा सद्दामसह त्याचे तीन सहकारी फैयाज, राशिद आणि अक्तर या चौघांना गोवंडी परिसरातून अटक केली. चौकशीत ते चौघेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील गुन्हेगार आहे, सद्दामविरुद्ध शिवाजीनगर पोलीस पाच, राशिदविरुद्ध दोन, फैयाजविरुद्ध सहा तर अक्तरविरुद्ध एका गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते, त्यामुळे त्यांना या सर्व गुन्ह्यांत अटक केली जाणार आहे. अटकेनंतर या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.