मुक्तपीठ टीम
माणूस घडविण्याचे आणि संस्कारक्षम बनविण्याचे काम वाचनाने होते. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून ही वाचनाची सवय जोपासण्याचे काम होईल, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील मराठी भाषा समिती यांच्या विद्यमाने “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते झाले. विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव अनिल महाजन, प्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा, उपसचिव आठवले आदींची यावेळी उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या देशाला विकसित देश बनवण्याचा प्रयत्न केला. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आहोत. अर्थात आपण शिक्षित झालो नाही तर विकसित देश बनवण्याच स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळेच वाचनसंस्कृती आणि या दिनाचे महत्व आहे. पूर्वीच्या काळी वाचन अधिक प्रमाणात होते. आता दूरदर्शन, इंटरनेट आदी माध्यमामुळे ते कमी झाल्याचे दिसते आहे. पाहिजे ती माहिती आता सहजगत्या या माध्यमावर उपलब्ध होत असल्यामुळे वाचनाची सवय कमी झाली असली तरी ती सवय जोपासणे आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कवयित्री नीरजा यांनी, ‘सांस्कृतिक उभारणी आणि वाचन संस्कृती ‘ या विषयावर विचार मांडले. ग्रामीण भागात आजही वाचनाची भूक आहे. तेथील तरुण पिढी वाचनाकडे वळते आहे, असे त्या म्हणाल्या.
वाचन हे तुम्हाला सुसंस्कृत बनवते. त्यामुळे विविधांगी विषयावर वाचन आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्रात संत परंपरा, परिवर्तनवादी चळवळ, पुरोगामी साहित्याने पिढ्या न पिढ्या वाढल्या आहेत. सहिष्णू समाजाची निर्मिती करण्यासाठी वाचन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नव्या पिढीने अधिकाधिक वाचन करणे आणि लिहिते होणे आवश्यक आहे. आपले राज्य हे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे राज्य आहे. त्यामुळेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाचन चळवळीला बळ देण्याचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शुभ संदेश वाचून दाखविण्यात आले.
दीप प्रज्वलन आणि ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सहसचिव श्री.महाजन यांनी केले. यावेळी त्यांनी विधिमंडळाच्या मराठी भाषा समिती कक्षाची स्थापना आणि त्याद्वारे करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्त विधिमंडळ सचिवालयातील विविध अधिकारी, कर्मचारी यांनी सादरीकरण केले. यात मीरा सावंत, विनय पाटील, संगीता विधाते, अन्नपूर्णा इंगळे, अनुजा सावंत, रवींद्र ठाकरे,सचिन बोरकर यांनी त्यांचे वाचनानुभव सादर केले.
सूत्रसंचलन सचिन बोरकर यांनी केले. आभार विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी मानले. विधिमंडळ सचिवालयातील विविध अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.