मुक्तपीठ टीम
कळंबोलीतील प्रस्तावित कोरोना रूग्णालयाचे येत्या 15 दिवसात पनवेल महापालिकेकडे निश्चित हस्तांतरण केले जाईल. त्यानंतर ते लगेचच सुरू करून लोेकसेवेत समर्पित करण्यात येईल, अशी ग्वाही सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना लेखी स्वरूपात दिले आहे. त्यामुळे 5 कोटी रूपये खर्च करून अडगळीत पडलेल्या कोरोना रूग्णालयाची शुभ घटिका समिप आल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
पनवेलसारख्या अतिसंवेदनशिल शहराला सिडकोकडून कोविड हॉस्पीटल देण्याचे आदेेश खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोचे कामचुकार आणि अतिहुशार समजले जाणारे व्यवस्थापकिय संचालक संजय मुखर्जी यांना दिल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना गुंडाळून गेल्या पाच महिन्यात अनेकदा आश्वासनांचे गाजर दाखविले. त्याशिवाय पनवेल महापालिका आणि सिडको अधिकार्यांमधून अग्नी जात नसल्याने त्यांच्या भांडणाचाही गंभीर परिणाम कोविड हॉस्पीटल सुरू होण्यावर झाला आणि उभयतांमध्ये गेले चार महिने पत्रयुद्ध झडत राहिले.
या पार्श्वभूमिवर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना धारेवर धरून लिहिलेल्या कोविड हॉस्पीटलसंदर्भातील पत्रात, आठ दिवसात हॉस्पीटल सुरू न केल्यास सिडको अधिकार्यांना पनवेल विधानसभा मतदार संघात फिरू न देण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने सिडको अधिकार्यांनी पायाला चक्री बांधून हॉस्पीटल सुरू करण्यासंदर्भातील त्रुटी दूर करण्याचे प्रयास सुरू केले.
सिडको भवनातील धायटकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी येत्या 15 दिवसात काम पूर्ण करून महापालिकेकडे कळंबोलीतील कोविड हॉस्पीटल हस्तांतरण करण्याचे कडू यांना लेखी कळविले आहे. पनवेल महापालिकेने हॉस्पीटलच्या अग्निशमन यंत्रणेचा मुद्दा उपिस्थत केल्याने तिथे यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ठेकेदाराला वीस हजार लिटर पाण्याच्या साठ्यासाठी टाक्या बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्या टाक्या अहमदाबाद येथून मागविण्यात आल्या आहेत. येत्या चार ते पाच दिवसात ते काम पूर्णत्वास जाईल. सिडकोने या हॉस्पीटलसाठी 5 कोटी रूपये खर्च केले आहेत. हॉस्पीटल चालविण्याची जबाबदारी पनवेल महापालिकेने स्वीकारली आहे. त्यांनी हस्तांतरण प्रक्रियेनंतर लोकसेवत तातडीने समर्पित करावे, असेही धायटकर यांनी सांगितले.
एकंदर पनवेल संघर्ष समितीच्या कणखर बाण्याने आणि निर्वाणीच्या इशार्यानंतर सिडकोची यंत्रणा हादरली असून त्यांनी आता काम पूर्णत्वास नेण्याचे मनावर घेतल्याने महिनाअखेरीस कळंबोलीतील हॉस्पीटल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आजच्या बैठकीतून चित्र स्पष्ट झाले.
धायटकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर तर संघर्ष समितीच्यावतीने कांतीलाल कडू, सचिन पाटील, हरेश पाटील आणि उदय पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.