मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाची दुसरी लाट येण्यामागचे कारण म्हणजे लोकांचा वाढता हलगर्जीपणा. कोरोनाची लाट देशासह महाराष्ट्रातही उफाळली आहे. राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले असले तरी नागरिक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. याच पाश्वभूमीवर येवल्यात नवीन नियम लागू करण्यात आला आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना बाधित सापडल्यास थेट कोरोना सेंटरमध्ये त्यांची रवानगी करण्यात येत आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड टेस्ट….
राज्यात पंधरा दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी येवला शहरात अजूनही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहे. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून स्वतः प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले ,पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर ,पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकडे या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित येवला शहरातील विंचूर चौफुलीवर विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे.
कोरोना बाधित आढळल्यास कोरोना सेंटरला रवानगी….
- येवला शहरातील विंचूर चौफुली येथे गेल्या चार ते पाच दिवसापासून विनाकारण फिरणाऱ्यांवर विविध प्रकारच्या कारवाया करण्यात येत होत्या.
- मात्र तरीदेखील नागरिक घराच्या बाहेर विनाकारण फिरत होते.
- याच पाश्वभूमीवर आजपासून प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे.
- ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे, त्यांची रवानगी कोरोना सेंटरमध्ये करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकडे यांनी दिली आहे.