मुक्तपीठ टीम
संकटात संधी असते. विशेषत: त्यांच्यासाठी ज्यांना जीवनात काही सकारात्मक करून दाखवायचे असते. कोरोना संकट काळातही तसे दिसून आले. याच कोरोना संकटात फरीदाबादमधील शिव नाडार शाळेमध्ये शिकणार्या पाच विद्यार्थीनींनी एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यानी अल्ट्रा व्हॉयलेट स्टेरलाइजिंग लाइटचा वापर करत सेल्फ सॅनिटायझिंग बेंच तयार केला आहे.
हे बेंच वापरल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्स, कंजक्टिवाइटिस, हिपेटाइटिस आणि कोरोनाचा धोका कमी होतो. त्या बेंचला त्यांनी ‘सेफ’ असं साजेसे नाव दिले आहे. कॅप्सटोन प्रोजेक्ट अंतर्गत तयार केलेले हे बेंच शाळेच्या वार्षिक टेक इव्हेंट कोलोक्वियम २०२० मध्ये प्रदर्शित केले जाईल. असे बेंच त्यांना फरीदाबादमध्ये अन्य ठिकाणी बनविण्याच्या योजनेवर त्या काम करत आहे.
निर्वाणी जैन, अर्शिया जेटली, सुहानी शर्मा, गुरनूर कौर आणि मानसी अग्रवाल अशी या पाच विद्यार्थीनींची नावे आहेत.
सार्वजनिक स्थळी स्वच्छता आणि सुरक्षा वाढवण्याच्या गरजेतून त्यांनी सेफ बेंचचा शोध लावला. त्यासाठी सेनिटायझिंग बेंच बनवण्याचे ठरवले. असे बेंच केवळ शाळाच नव्हे तर रुग्णालये, उद्याने, मॉल्स आणि इतर मोकळ्या जागीही वापरता येतील.
या बेंचमध्ये क्यूआर कोड देखील आहे जो स्वच्छता प्रक्रियेची अंतिम तारीख आणि वेळ नोंद ठेवतो. माहितीही देतो. या विद्यार्थींनीनी दहा महिन्यांत हा बेंच तयार केला आहे. यासाठी त्यांनी झूम आणि गूगल मीटच्या माध्यमातून एकमेकांशी समन्वय साधून हे कार्य पूर्ण केले आहे.
पाहा व्हिडीओ: