मुक्तपीठ टीम
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महाराष्ट्रात दहा जागी लढण्यासाठी मिळणे शक्य होत नसते. मात्र, आसामच्या लढाईत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएत रिपाईचे उमेदवार दहा जागी लढत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या तेथे प्रचार दौऱ्यावर असून बाबासाहेबांच्या नावाने मतदारांना साद घालत त्यांनी एनडीएसाठी मते मागितली आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मतदारांना संबोधित करताना, “लोकशाही राज्यव्यवस्थेत निवडणूक प्रक्रिया महत्वाची असून समान मताधिकार हा लोकशाहीचा प्राण आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत एक मूल्य या समतेच्या न्यायाने देशात समान मताधिकार देऊन राजकीय समता देशाला दिली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या मजबुती साठी मतदानाचा बहुमूल्य अधिकार वापरून मतदारांनी मतदान करावे असे आवाहन करून मतदानाचा समान अधिकार देणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला साथ द्या, आसामच्या विकासासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे
म्हटले आहे.
नुकताच त्यांनी आसाम मधील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आसाम दौरा केला. त्यावेळी गुवाहाटी येथील चेंगा विधानसभा मतदार संघातील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार शेख नुरूल आलम यांच्या जाहीर प्रचार सभेत ना रामदास आठवले यांनी मतदारांना मतदान करून लोकशाहीतील आपले कर्तव्य पार पडण्याचे आवाहन केले. यावेळी रिपाइं चे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, आसाम प्रदेश अध्यक्ष हितेश देवरी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने संपूर्ण ईशान्य भारत चा विकास करण्याचा निर्धार करून जोरदार विकासकामे सुरू केली आहेत.आसामचा विकास भाजप च्या काळातच सुरू झाला आहे. त्यामुळे आसाम मध्ये १० जागा रिपब्लिकन पक्ष लढत असून इतर सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजप ला पाठिंबा असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले.