तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
कोणत्याही संवेदनशील माणसाचे डोके तापेल अशीच घटना ठाण्यात घडली. एका फेरीवाल्या गुंडाने केलेल्या जीवघेण्या कोयत्या हल्ल्यात ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजिवडा प्रभागातील अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांना दोन बोटं गमवावी लागली. त्याचा अंगरक्षकाचेही एक बोट तुटले. त्यांची तुटलेली बोटे आणि सांडलेले रक्त हे कायद्याचे काढलेले धिंडवडेच, कायद्याचे केलेले तुकडेच आहेत. फेरीवाल्यांमधील माफियांनी कायद्याच्या राज्याला दिलेले आव्हानच आहे. आता जास्त काही नाही. या फेरीवाल्या माफियांना त्यांच्यात पद्धतीनं नेस्तनाबूत करणारी अद्दल घडवलीच पाहिजे.
जे घडलं ते माफियांचा माज दाखवणारं!
- ठाण्यातील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कल्पिता पिंपळेंच्या नेतृत्वाखाली ठाणे मनपाचे पथक गेले होते.
- या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याने अचानक धारदार कोयता काढून कल्पिता पिंपळेंवर हल्ला केला.
- बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली.
- बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे.
- कल्पिता पिंपळे यांना सुरुवातीला जवळच्याच वेदांत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
- आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
काही मनपा अधिकारी-कर्मचारी हफ्तेखोर असतीलही, त्यांच्यामुळे यादवासारख्या माफिया प्रवृत्ती बोकाळत असतीलही, पण चुकीला क्षमा नाहीच म्हणजे नाहीच! या घटनेतून दिसून येते की हातावर पोट असणाऱ्या गरीब फेरीवाल्यांसाठी आपल्या मनात असलेल्या सहानुभुतीचा हे माजोर्डे माफिया कसा गैरफायदा घेत आहेत. त्यांची कमाई हजारोंच्या घरात असते. तेवढंच नाही तर ते पालिकेच्या जनतेच्या चालण्यासाठी असलेल्य पदपथांवर मालकीच निर्माण करतात. काही तर गरीब फेरीवाल्यांनाही लूटतात. त्यांच्याकडून हप्ते घेतात. त्या हप्त्याचे वाटेकरी असणाऱ्या भ्रष्ट पालिका अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांनी आता जागावे. आज कल्पिता पिंपळेंची बोटं होती, उद्या या फेरीवाल्या माफियांच्या कोयत्याचे वार तुमच्या गळ्यावर होतील. त्यावेळी त्याखालील खिशात ठेवलेले हप्त्याचे पैसेही कामाला येणार नाहीत. जागा आता आणि अद्दल घडवा!
नेत्यांकडून दखल, पण नंतर विसर नसावा!
फेरीवाल्या माफिया अमरजित यादवच्या हल्ल्यात बोटे गमावलेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं भेट घेतली. त्यांच्यावरील उपचारांची सर्व जबाबदारी ठाणे महानगरपालिकेने घेतली. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटकही केली. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेला प्रश्न योग्यच. “या अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये इतका मस्तवालपणा, इतकी मुजोरी येते कुठून?”
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अमरजित यादवला पोलिसांनी सोडताच फटकावण्याचा इशारा दिला आहे. फटकावणे वगैरे नाही सांगणार. पण एक नक्की. जर या प्रकरणाचा पाठपुरावा घेत त्या माजोर्ड्या फेरीवाल्या माफियाला जामीनच मिळू नये यासाठी मनसेनं प्रयत्न केले तर अधिक चांगलं होईल. शिवसेना-राष्ट्रवादीनं सत्तेचं बळ वापरत सरकारी वकिलांकडून तेवढं करून घ्यावंच घ्यावं. पोलीस अधिकाऱ्यांनी किमान तिथं योग्य कलमांची वाढ करण्यात गैर नाही. जो मनपाच्या महिला अधिकाऱ्यावर कोयत्यानं वार करु शकतो तो माफिया फेरीवाला अन्य समाजविघातक कारवायांमध्येही असू शकतो. पोलिसांनी शोध घ्यावा.
सर्व नेत्यांना एकच विनंती. केवळ बोलायचं. टाळ्या मिळवायच्या. आणि मग लोक विसरले की आपणही विसरून जायचं हे किमान या प्रकरणात होऊ नये. यासाठी या तीनही नेत्यांनी खास लक्ष द्यावं.
एक इंसाफ, फेरीवाल्यांमधील माफिया साफ!
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक इशारा शाळकरी जीवनात वाचला होता. ते म्हणाले होते, “एक इंसाफ, फुटपाथ साफ!” आता फुटपाथ संपूर्ण साफ करणं नसेल शक्य होणार तरी चालेल. एका माफियामुळे सर्वच फेरीवाल्यांच्या पोटावर लाथ नको. पण फेरीवाल्यांमध्ये दडलेल्या सर्वच माफियांना आता अद्दल घडवाच घडवा. त्यात कसलीही हयगय नको. भले मग त्यात या नेत्यांचाही एखादा कार्यकर्ता असेल. असू द्या. माफिया हे माफियाच. त्यात गरीब श्रीमंत असं काही नाही. त्यांचा माज उतरवलाच पाहिजे. महाराष्ट्र सर्वांना आपलं म्हणतो. पोट भरतो. पण जर हे परप्रांतीय महाराष्ट्रातच माफियागिरी करणार असतील. तर त्यांना तडीपारही कराच करा. त्यात मतांच्या राजकारणाचा अडथळा नको. विशेषत: शिवसेनेने बाळासाहेबांच्या “एक इंसाफ-फुटपाथ साफ” नको पण किमान “एक इंसाफ, फेरीवाल्यांमधील माफिया साफ” करावेच करावे. अशा माफियांनी पिडलेले सर्वसामान्यच नाही तर गरीब प्रामाणिक फेरीवालेही दुवा देतील.
तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्तमाध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite
हेही वाचा: अण्णा हजारेंची झोपमोड! अण्णा, स्वत:चे डोळे आणि कान उघडून पाहा, ऐका आणि बोला!