मुक्तपीठ टीम
रमजानचा महिना इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र असा. टाटा समूह व्यवसाय करतानाही सामाजिक बांधिलकी पाळणारा. त्यातूनच टाटा समूहाच्या जाहिरातींमधून सामाजिक संदेश मिळत असतात. टाटा मोटर्सची रमजान महिन्यासाठी केलेली नवी जाहिरात असाच आपुलकीचा संदेश देणारी…
रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त जगातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने आपली नवीन मार्केटिंग मोहीम सुरू केली आहे. टाटा मोटर्स विथ #कॅलेब्रेटींगगूडनेस नावाने राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत आपुलकीचे बंध मजबुत करणारी ही जाहिरात प्रत्येकाला भावेल अशीच आहे.
जाहिरात आखाती देशांमधील दाखवली आहे. जाहिरातीस सुरुवात होते तेव्हा टाटा मोटर्सच्या बसमधून प्रवास करणारे एका कंपनीचे कर्मचारी दिसतात. त्यांचे लक्ष बाहेर जाते, त्यांच्या कंपनीचे मालक गाडी बिघडल्यामुळे रस्त्यावर उभे असतात. कर्मचारी बस थांबवतात. त्यांची कार दुरुस्त करण्यासाठी मदतीचा प्रयत्न करतात. पण एक पार्ट जळाला असल्याने गाडीला वर्कशॉपमध्ये नेण्याशिवाय पर्याय नसतो. मालक दुसरी गाडी मागवतात. पण रमजानच्या इफ्तारीची वेळ झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता जाणवते. कर्मचारी ओळखतात. मालकांना ते बसमधून येण्यास सांगतात. बस तुमचीच असल्याचे सन्मानानं सांगतात. बस मालकाच्या आलिशान बंगल्याजवळ पोहचते. मालक उतरतात. पण सर्व कर्मचाऱ्यांना सांगतात, माझ्या इफ्तारीची वेळ चुकेल म्हणून तुम्ही मला लिफ्ट दिलीत, आता तुमची इफ्तारीही चुकायला नको. या माझ्या घरात इफ्तारी करा. जाहिरात संपताना सर्व कर्मचारी मालकांच्या कुटुंबियांसोबत इफ्तारी करत असतात. आपुलकीचे बंध कसे जुळतात ते दाखवण्याचा प्रयत्न आहे.
ही जाहिरात राष्ट्रीयत्व आणि वंशांचे भेद विसरत प्रत्येकामध्ये करुणा, परोपकार आणि समानतेची भावना जागवण्यावर भर देणाऱ्या संकल्पनेवर बेतली आहे. भारतातील सर्जनशील संस्था ओगल्वी यांनी विकसित केली आहे.
या जाहिरातीच्या लाँचिंगवर बोलताना, टाटा मोटर्सचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय, उपाध्यक्ष रुद्ररूप मैत्र म्हणाले, “जगभरातील टाटा मोटर्सच्या ग्राहकांसाठी रमजान हा महत्वाचा काळ आहे आणि दरवर्षी या शुभ कालावधीत टाटा मोटर्सचा वाटा आहे. मानवी भावनेचा एक सुंदर संदेश जो आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवतो. या वर्षी, टाटा मोटर्स या सुंदर व्हिडीओद्वारे एकमेकांना मदत आणि प्रेरणा देण्याच्या भावनेचा संदेश दिला आहे.
टाटा मोटर्स लिमिटेड ही ३५ अब्ज डॉलर्स उलाढाल असलेली संस्था आहे, जी मोटार, युटिलिटी वाहने, पिक-अप, ट्रक आणि बसेसची जागतिक ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्स ११३ अब्ज डॉलर्सच्या टाटा समूहाचा एक भाग आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत १०३ सहाय्यक कंपन्या, १० सहयोगी कंपन्या, ३ संयुक्त उद्यम आणि २ संयुक्त ऑपरेशनच्या मजबूत जागतिक नेटवर्कद्वारे भारत, ब्रिटेन, दक्षिण कोरिया, थायलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशियामध्ये त्यांचे ऑपरेशन्स आहेत.
पाहा व्हिडीओ: