मुक्तपीठ टीम
बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी नियमात बसत नसतानाही लसीकरणासाठी धरलेला खोट्या ओळखीचा गैरमार्गच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या अभिनेता तन्मय फडणवीसनेही वापरल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे अभिनेत्रींच्या लसीकरणावरून आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजपा नेत्यांनीची भलतीच अडचण झाली आहे. माहिती अधिकारातून तन्मयने आरोग्य कर्मचारी म्हणजे फ्रंटलाईन वर्कर असल्याचे भासवून लस घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच त्याला मुंबईच्या सेव्हन हिल्समध्ये पहिला डोस आणि त्यानंतर नागपुरात दुसरा डोस मिळाला होता.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २५ वर्षीय पुतण्याने एप्रिलमध्ये लस घेतल्याचे प्रकरण सोशल मीडियावर चागलचं गाजलं. १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वीच फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस हा तेव्हाच्या वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील त्याला लस देण्यात आली होती. या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका झाली. दरम्यान, तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याची बाब आता समोर आली आहे.
तन्मय फडणवीस…ट्विटरवर अभिनेता, लसीसाठी आरोग्य कर्मचारी!
• देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शुभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांनी पहिला डोस मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये घेतला होता. त्यांनी दुसरा डोस नागपूरमध्ये घेतला होता.
• त्याने लसीकरणापूर्वी आरोग्य सेवक म्हणून नोंद केल्याची माहिती अधिकारात स्पष्ट झाली आहे.
• बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर इथले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती.
• त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तन्मय याने आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवत कोरोना लस टोचून घेतली आहे.
• प्रत्यक्षात तन्मय फडणवीस याच्या ट्विटर फ्रोफाईलवर अभिनेता असा उल्लेख आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
• तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे.
• त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही.
• जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही.
• पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे, असं ते म्हणाले होते.
अमृता फडणवीसांनी केली होती रांग तोडणे थांबवण्यासाठी कृतीची मागणी
• अमृता फडणवीस यांनीही तन्मय प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती.
• कोणत्याही सेवेची प्राथमिकता ही शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी.
• नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही.
• कायदा आपले काम करु शकतो आणि आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत!
• आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत.
• कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा! असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.