मुक्तपीठ टीम
भीषण आगीत रुग्णांचे बळी गेलेल्या मुंबईतील ड्रिम मॉल अग्निकांडाची मुंबई मनपाने गंभीर दखल घेतली आहे. या आगीची चौकशी करुन दोषींवर कारवाईची घोषणा करण्यात आली आहे. या मॉलमध्ये रुग्णालय कसं असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळी भेटीनंतर विचारला होता. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तर थेट आरोप केला आहे. ते म्हणालेत, एचडीआयएलचा हा मॉल घोटाळ्यांचा महाल आहे. आगीतील मृत्यूंसाठी मॉलमालकावरच कारवाई झाली पाहिजे!
अनियमितालय असलेलं रुग्णालय!
• ड्रीम मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयाला ओसी नव्हती, असे आता उघड झाले आहे.
• ६ मे २०२० रोजी सनराईज रुग्णालयाला कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोरोना रुग्णालय म्हणून तात्पुरती परवानगी देण्यात आली होती.
• ३१ मार्च २०२१ रोजी तात्पुरत्या परवानगीचा कालावधी संपणार होता.
• मार्च महिन्यात या रुग्णालयातील अनियमिततांमुळे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.
आगीसाठी कोण दोषी? चौकशी आणि कारवाई होणार
• सनराईज हॉस्पिटल प्रशासनाची आग प्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
• कुणाचा निष्काळजीपणा भोवला याचीही चौकशी होणार आहे.
• मनपा आयुक्तांनी घोषणा केली आहे.
ड्रिम मॉल हा घोटाळ्याचा महाल!
भाजप नेते कीरीट सोमय्या यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल आहे. एचडीआयएलने हा मॉल बांधला. या रुग्णालयाला ओसी नाही. अग्निशामक यंत्रणा नाही. आगीतील मृत्यूसाठी यासाठी या मॉलच्या मालकाला जबाबदार धरलं पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
रुग्णालयाच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करणार
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आग लागलेल्या भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईज रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, ही आग अत्यंत भीषण आहे. निष्काळजीपणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच आगीला रुग्णालयातील कोण कोण जबाबदार आहेत, त्याचा तपास करण्यात येणार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल.