प्रा मुकुंद आंधळकर
महाराष्ट्र शासनाने शिक्षक व विद्यार्थ्यांना दि. १ मे ते १४ जून अशी उन्हाळी सुट्टी जाहीर करूनही काही शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने तसेच परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही बाब नियमबाह्य तसेच बेदरकारपणाची असून त्यामुळे अशा शाळा महाविद्यालयांवर कारवाई केली पाहिजे. मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यामाध्यमातून शिक्षकांनी तशी मागणी शिक्षणमंत्री प्रा वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. विद्यार्थी व शिक्षकांवर पडणाऱ्या ताणाचा विचारच या शाळा महाविद्यालयात केला जात नाही असे जाणवते आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार अत्यावश्यक सेवेसाठी शिक्षकांना दीर्घ सुट्टीत कामावर बोलावल्यास अर्जित रजेची तरतूद आहे त्यानुसार शिक्षकांना अर्जित रजा मिळेल. विद्यार्थ्यांना मात्र कोणत्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक दुष्परिणामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. रिझवी, पाटकर, नॅशनल, एन् एम् इत्यादी महाविद्यालयांमध्ये उन्हाळी सुट्टीत व्याख्याने-परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या व अशा शाळा महाविद्यालयांना सुट्टीत वर्ग भरवणे, परीक्षा घेणे यापासून रोखावे व त्यांना तशा त्वरित सूचना देऊन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुट्टीचा लाभ दिला जावा.
(प्रा मुकुंद आंधळकर हे मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आहेत.)