मुक्तपीठ टीम
दिल्ली भाजपा नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. भाजपाचे नेते कपील मिश्रा यांनी बग्गा यांना पंजाब पोलिस दलाच्या ५० जवानांनी घरातून अटक केल्याचा दावा केला आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ता प्रवीण शंकर कपूर यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केजरीवाल पंजाबमध्ये मिळालेल्या सत्तेचा राजकीय गैरवापर करत आहेत. सत्तेचा वापर ते विरोधकांना धमकावण्यासाठी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
तेजिंदर पाल सिंह बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी सांगितले की, आज सकाळी १०-१५ पोलीस आमच्या घरी आले आणि त्यांनी ताजिंदरला ओढून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मी माझा मोबाइल फोन उचलला तेव्हा पोलिसांनी मला दुसऱ्या खोलीत नेले. बग्गा यांच्याविरोधात १ एप्रिल रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर प्रक्षोभक विधाने करणे, शत्रुत्व वाढवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता
नेमकं प्रकरण काय?
- मार्च महिन्यात, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेत काश्मिरी पंडितांच्या निर्गमनावरील चित्रपट, द काश्मीर फाईल्स करमुक्त न करण्याबाबत विधान केले होते, ज्याने बराच गदारोळ केला होता.
- यावर बग्गा यांनी ट्विट करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती.
- तत्पूर्वी, छत्तीसगडमध्येही बग्गा यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये बग्गा यांच्यावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता.