मुक्तपीठ टीम
तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याविरोधात तक्रार करताच देवरेंविरोधात हालचाली सुरु झाल्या आहेत. आमदार लंकेंनी देवरेंवरच आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही लंकेंच्या समर्थनात आहेत. किर्तनकार इंदोरीकरांनीही लंकेंच्या कोरोना सेंटरमधील कार्यक्रमात त्यांना हत्तीची उपमा देत विरोध करणाऱ्यांना म्हणजे तहसीलदार ज्योती देवरेंना कुत्रे म्हणून हिणवले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही देवरेंविरोधात अहवाल सादर केल्याचे कळताच आता राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना ज्योती देवरेंसाठी मैदानात उतरली आहे. वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन करून पारदर्शक चौकशी करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.
तहसीलदार संघटना ज्योती देवरेंसाठी मैदानात!
- राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने यासंबंधी मुख्यमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांना एक निवेदन दिले आहे.
- तहसीलदार देवरे यांनी १६ ऑगस्टला तहसीलदार संघटनेकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी महिला अधिकारी म्हणून कुचंबना व अवहेलना होत असल्याचे म्हटले आहे.
- तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांचेकडून कामकाजादरम्यान प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अडथळा निर्माण केले जात असल्याचे म्हटले आहे.
- अशा प्रकारे स्थानिक पातळीवर कार्यरत महिला अधिकाऱ्याची कुचंबना व अवहेलना होण्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना तीव्र निषेध व्यक्त करीत आहे.
- संघटनेने या प्रकरणाची माहिती जाणून घेतल्यानंतर वास्तव समोर आले आहे, एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांविरोधात मर्जीने कामे न केल्याने तसेच त्यांच्यावर वचक निर्माण करण्याच्या अनुषंगाने दबाव टाकण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणत देवरेंविरोधात कारवाईचा अहवाल
- वरिष्ठांमार्फत पाहिजे तशी चुकीच्या पद्धतीने चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव सरकारला पाठविल्याचे दिसून येते.
- इतर लोकांकडून तक्रारी लिहून घेवून गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, त्याचेवर खोटया तक्रारी करुन कारवाईचा धाक दाखवून त्यांच्यावर प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने वरिष्ठांना कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यास बाध्य केल्याचे दिसून येते.
- ही निश्चितच गंभीर बाब आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे अनेक घटना घडल्या आहेत.
लोकप्रतिनिधींची मर्जीची कामे न केल्यानं महिला अधिकाऱ्यांचे करिअर संपवण्याची भीती
- महिला अधिकारी व इतर अधिकारी यांच्याविरोधात केवळ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने कामे न केल्यामुळे वरिष्ठांवर दबाव टाकण्यात आला.
- त्यांना पाहिजे तशा प्रकारच्या चौकशी करून कारवाईचे प्रस्ताव पाठविल्याचे दिसून आलेले आहे.
- यामुळे निश्चितच महिला अधिकारी व इतर अधिकारी यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत आहे.
- अशा घटनांमधून प्रसंगी महिला अधिकाऱ्यांचे करिअर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती नेमा!
- या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य स्तरावरून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती सात दिवसांत स्थापन करण्यात यावी.
- या समिती मार्फत पारदर्शक चौकशी करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.
- या प्रकरणी चौकशी पारदर्शक न झाल्यास संघटनेस नाईलास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
- या घटनाक्रमाचा राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे निषेध व्यक्त केला जात आहे असेही कार्याध्यक्ष सुरेश बगळी यांनी म्हटले आहे.