“सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक नको!”
मुक्तपीठ टीम सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देत असतांनाच ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सहकार्य केले जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते. महा ऑर्गनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या समवेत सेंद्रिय अणि विषमुक्त शेतीविषयक अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पदुमचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ,आयुक्त डॉ. परिमल सिंग याच्यासह पदुम आयुक्त, कृषि आयुक्त, सहकार आयुक्त, एफ. एस. एस. ए. आय. च्या संचालक श्रीमती प्रिती चौधरी, मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळ, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, बाजारात अनेक अन्न पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून विकले जातात मात्र ज्याच्या वेष्टनावर सेंद्रिय अन्नपदार्थ लिहिले असते त्यात तसे पदार्थ आहेत अथवा नाही याची खात्री नसते, त्यामुळे या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमन तयार केले आहे. यात जे अन्न पदार्थ सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणून पॅक करुन विक्री केली जाते त्या प्रत्येक पदार्थाला NPOP सर्टिफिकेशन यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच यावर 'जैविक भारत' चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा, असे नियम आहेत. सदर नियमांची अन्न व औषध प्रशासना (FDA) मार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून नकली सेंद्रीय उत्पादनावर कारवाई केली जाईल. जनतेला अधिकृत सेंद्रिय उत्पादने मिळणेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी सांगितले. राज्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक – कृषिमंत्री दादाजी भुसे सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. ...
Read more