मुक्तपीठ टीम
पुने मनपाच्या कारवाईनंतर बेघर झालेल्या आंबिल ओढा येथील नागरिकांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने पुणे मनपा समोर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी “अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद,” अशा घोषणा दिल्या. झोपडपट्टी तोडण्यामागे असलेला बिल्डर हा अजित पवारांचा माणूस असल्याचा आरोप होत आहे. त्यातून हा सुप्रिया सुळेंना निदर्शकांचा संताप सहन करावा लागला. पण त्यांनी शांतपणे निदर्शकांची समजूत काढली. राजकारण न करता मार्ग काढूया, असे आवाहन केले.
आंबिल ओढा कारवाईविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे मनपासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी जवळच असलेल्या आंदोलनाच्या भेटीला आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भेट दिली. यावेळी सुळे यांनी जमिनीवर बसूनच येथील बाधित महिलांशी संवाद साधला. मात्र या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी “अजित पवार मुर्दाबाद.. महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद,” अशा घोषणा दिल्या आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी संयम राखण्याचं व राजकारण न करण्याचं आवाहन केलं. ” मी इथे राजकारण करण्यासाठी आले नाही. हा विषय संवेदनशीलपणे सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही राजकारण आडवं न आणता हा प्रश्न मार्गी लावावा.”
काय आहे आंबिल ओढा प्रकरण?
- आंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं करण्यात आली असून ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं करण्यात आली आहेत.
- त्यामुळं पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी तुंबते.
- तसंच, मोठं नुकसान होतं, असं कारण देत मागील आठवड्यात मनपाने येथील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली होती.
- या कारवाई दरम्यान काही घरेही पाडण्यात आली.
- कोर्टानं स्थगिती दिल्यानं ही कारवाई मध्येच थांबवण्यात आली असली तरी अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत.