मुक्तपीठ टीम
८३ वर्षीय आईला तिचा हरवलेला मुलगा कॅप्टन संजीत भट्टाचार्जीचा शोध घेण्यासाठी काय पावले उचलण्यात आली आहेत याची त्रैमासिक माहिती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्राला दिले. कॅप्टन २५ वर्षांहून अधिक काळ पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने बेपत्ता लष्करी अधिकाऱ्याच्या आईच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, सरकारने तिच्या मुलाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी त्यांची इच्छा आहे. यावर केंद्रातर्फे हजर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज म्हणाले की, कॅप्टन भट्टाचार्जींचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी राजनयिक आणि इतर माध्यमांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. प्रगतीची माहिती ठेवली जाईल. दुसरीकडे, पाकिस्तान सरकार आतापर्यंत भट्टाचार्जींची उपस्थिती नाकारत आहे.
लष्करी अधिकाऱ्याच्या वृद्ध आईने सांगितले की, त्यांना ३१ मे २०१० रोजी राष्ट्रपतींचे तत्कालीन लष्करी सचिव मेजर जनरल यांचे पत्र मिळाले होते. विद्यमान बेपत्ता युद्धकैद्यांच्या यादीत संजीत भट्टाचार्जी यांचे नाव जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याचिकेत म्हटले आहे की, त्यांना माहिती देण्यात आली होती की, बेपत्ता संरक्षण कर्मचार्यांचा मुद्दा जुलै २००१ मध्ये आग्रा शिखर परिषदेसह अनेक वेळा पाकिस्तानी अधिकार्यांसमवेत उच्च पातळीवर उपस्थित करण्यात आला होता. मात्र संजीतचा शोध लागला नसल्याची माहिती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी आईच्या याचिकेवर केंद्राला कॅप्टन संजीत भट्टाचार्जीचा शोध घेण्यासाठी उचललेल्या पावलांचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. याचिकेत म्हटले आहे की याचिकाकर्त्याला अशी माहिती मिळाली आहे की ऑगस्ट १९९२ मध्ये भारतीय सैन्याच्या गोरखा रायफल्स रेजिमेंटचे अधिकारी म्हणून नियुक्त झालेले संजीत भट्टाचार्जी लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात कैद आहेत.