मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाने व्हर्चुअल सुनावणीत एकामेकांपासून वेगळे राहणाऱ्या दाम्पत्यांना एकत्र आणले आहे. न्यायालयाने सुनिश्चित केले की, पती पत्नीला सन्मानाने घरी घेऊन जाईल. न्यायालयाने म्हटले की, यानंतर काही काळ पतीच्या वागण्यावर न्यायलयाचे लक्ष असेल आणि त्याला पत्नीवर दाखल केलेले सर्व खटले मागे घ्यावे लागतील.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने पाटणामधील एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली, जो आपल्या पत्नीसोबत कायदेशीर लढाई लढत होता. त्या व्यक्तीने पत्नीसह व्हर्चुअल उपस्थितीसाठी विनंती केली होती. न्यायालयाने प्रथम हिंदीत रांचीतील कांके येथे राहणाऱ्या पत्नीला विचारले की ती तिच्या पतीसह सासरी परतण्यास तयार आहे का? तेव्हा महिलेने सांगितले की, जर पतीने त्रास दिला नाही तर मी जाण्यास तयार आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पतीला विचारले, ‘तुम्हाला सर्व खटले मागे घ्यायचे आहेत का? तुमच्या वडिलांनीही एक खटला दाखल केला आहे. त्यावर पतीने हो असे उत्तर दिले. न्यायालयाने म्हटले, “जामीन मिळविण्यासाठी हे नाटक तर नाही, आम्ही तुम्हाला सोडणार नाही… आम्ही ही याचिका प्रलंबित ठेवत आहोत.” सर्व खटले मागे घ्या. अॅफिडेविट द्या आम्ही सोडणार नाही. अन्यथा तुम्हाला पुन्हा तुरुंगात जावे लागेल.अॅफिडेविटसाठी न्यायालयाने पतीला दोन आठवड्यांचा वेळ दिला असून पत्नीला सन्मानाने घरी परत घेऊन जाण्यास सांगितले आहे.
याआधी, २८ जुलै रोजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आंध्र प्रदेशात वेगळे राहणाऱ्या दांपत्याची व्हर्चुअल सुनावणी घेतली. २१ वर्षापासून कायदेशीर लढाई लढणाऱ्या दाम्पत्याला पुन्हा एकत्र आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त प्रयत्न केले होते आणि पत्नीला हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीची शिक्षा वाढवण्यासाठी केलेली याचिका मागे घेण्यासाठी तयार केले होते.