मुक्तपीठ टीम
शिवसेनेतील बंडखोरीसंबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली आहे. या खंडपीठासमोर २० जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हेमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
यापूर्वी ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी त्यांना दिलासा देत तात्पुरती पुढे ढकलली होती. तेव्हा याप्रकरणी खंडपीठ स्थापन करण्यात येईल, असे सांगितले होते. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा देत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना काहीही निर्णय न घेण्याचे आदेश दिले होते.
महाराष्ट्रातील घडामोडी
- शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
- एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप किंवा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
- सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.
- राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्ताराची शक्यता आहे.
- आजवर झालेल्या २ मंत्रिमंडळ बैठकांमध्ये शिंदे-फडणवीसच सहभागी असल्याने त्यांची चेष्टा केली जात आहे.
- काहींच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचे तसेच राज्यपालांच्या सरकार बनवण्याच्या निमंत्रणाचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे अद्याप विस्तार झालेला नाही.