मुक्तपीठ टीम
मुंबईतील १ हजार २०० कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने अटक केली आहे. या कारवाईच्या काळात संजय राऊत यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. दरम्यान, सगळ्या बोगस केस कागदावर आणून खोट्या केसमध्ये संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोप संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. “मी संजय राऊत यांना भेटलो, ते ओके आहेत, बिनधास्त आहेत. त्यांना काही टेन्शन किंवा भीती नाही.” अशी माहितीही त्यांनी दिली.
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाखांची रोख रक्कम ही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेना पक्षाला दिलेली असलेयाचा दावाही सुनील राऊत यांनी केला आहे.
सुनील राऊत यांचा बनावट केसेसचा आरोप!
- सगळ्या बोगस केस कागदावर आणल्या आहेत.
- पूर्वी ज्या केसच्या चौकशीसाठी संजय राऊत यांना बोलावलेलं होतं, त्याच्या खोट्या केस बनवून अटक दाखवण्यात आली आहे.
- सकाळी साडेनऊ-दहा वाजताच्या सुमारास त्यांना जेजेमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेतील, तर साडेअकरा बाराला कोर्टात हजर करतील.
- पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नाही, एक टक्काही नाही, संजय राऊत यांना कागदपत्र वाचून दाखवण्यात आली, की कशात अटक करण्यात आली आहे, त्यात याचा उल्लेख नसावा.
- ५० लाखाच्या एन्ट्री आणि काहीतरी बोगस केस फाईल बनवून अटक केली आहे.
संजय राऊत ईडी कोठडीतही एकदम ओके!
- मी संजय राऊत यांना भेटलो, ते ओके आहेत, बिनधास्त आहेत.
- त्यांना काही टेन्शन किंवा भीती नाही.
- दहा लाखांची जी कॅश सापडली, त्याच्यावर ज्यांनी ताबा घेतला, त्यावेळी लिहिलं होतं अयोध्या आणि एकनाथ शिंदे.
- ते अयोध्याला गेले होते, त्याचं काँट्रिब्युशन होतं, ते पक्षाचे पैसे आहेत आणि पक्ष कार्यालयात जमा होणार होते.
- आम्ही न्यायालयीन लढाई लढणार.
- तुम्ही रामायण-महाभारत बघा, सत्याचाच विजय होतो.
- संजय राऊत यांना काही दिवसात न्याय मिळेल, भाजपा राऊतांना घाबरली म्हणून अटक केली.