मुक्तपीठ टीम
मुंबईसह राज्यातील रखडलेले व प्रस्तावित क्रीडा संकुलांचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
शनिवार ६ मार्च रोजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मुंबईमधील विविध क्रीडा संकुलांना भेटी दिल्या त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले, क्रीडा क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये स्त्री- पुरुष समानता असते, जातीभेदाचे राजकारण होत नाही, गरीब-श्रीमंत हा भेद राहत नाही. फक्त गुणवत्तेच्या जोरावर माणूस पुढे जातो. क्रीडांगण असणाऱ्या भागातील रहिवाशांच्या आणि येथील स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार, विविध विभागात शासनातर्फे प्रस्तावित क्रीडा संकुलांचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, त्यानुसार हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्च महिन्यात या क्रीडा संकुलाचे काम सुरु करण्यात येईल. यासाठी स्थानिक रहिवाशांनी, पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी एकत्र येऊन या कामामध्ये सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी प्रथम भारत स्काऊट अँड गाईड महाराष्ट्र राज्य मुख्यालय या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. नंतर भारत स्काऊट अँड गाईड दादर या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर धारावी, बांद्रा, सिंपोली, कांदिवली अशा विविध भागातील आणि शेवटी इस्कॉन येथील मंदिरास भेट देऊन विश्वस्तांशी देशी गाई संवर्धनांविषयी सविस्तर चर्चा केली.