मुक्तपीठ टीम
सुल्ली डिल्स आणि बुल्लीबाई अॅप प्रकरणात आणखी एक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. सुल्ली डिल्सचे निर्माते ओंकारेश्वर ठाकूर आणि बुल्ली बाई अॅपचे निर्माते नीरज बिश्नोई यांनी पोलिस चौकशीत सांगितले की, अॅप बनवण्यापूर्वी २१ जानेवारी रोजी ट्विटर हँडलवर ट्रेड महासभा ग्रुप तयार करण्यात आला होता. हा ग्रुप तिसऱ्या व्यक्तीने तयार केला होता. या ग्रुपमधील संभाषणानंतर वादग्रस्त अॅप बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जून-जुलै २०२१ मध्ये सुल्ली डील्स बनवण्यात आला.
दुसरीकडे, नीरज बिश्नोईच्या लॅपटॉपचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. ट्रेड महासभा ग्रुपची स्थापना करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. ट्रेड महासभा ग्रुपमधील सर्व आरोपी एकमेकांना ओळखत नसून सर्वांनी आपली आडनावे बदलली होती.
इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑप्स (IFSO), स्पेशल सेलच्या युनिटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नीरजच्या लॅपटॉपच्या अहवालावरून असे दिसून आले आहे की त्याने ट्रेसिंग टाळण्यासाठी टॉर ब्राउझरचा वापर केला. त्याच्या मोबाईलवरून १५३ लिंक सापडल्या आहेत. पोलिसांनी या लिंक्स उघडून पाहिल्या. यातील बहुतांश लिंक पॉर्न चित्रपटांच्या आहेत. याशिवाय काही लिंक्सवर हिंदू धर्माचा संपूर्ण इतिहास आहे.
या लिंक्समध्ये मुघल आणि इंग्रजांनी हिंदू धर्म संपवला असे म्हटले आहे. हिंदू धर्म वाचवण्यासाठी काहीही केले जात नाही. एका लिंकमध्ये हिंदू धर्म म्हणजे काय आणि मनुस्मृती कशी लिहिली गेली आणि त्यात काय आहे यासंबंधित माहिती आहे. एसीपी रमेश लांबा यांच्या देखरेखीखाली इन्स्पेक्टर हंसराज, भानुप्रताप, अरुण आणि एसआय नीरज आणि पवन यांची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे.
दोन्ही आरोपी गुरुवारपर्यंत दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई, नोएडा आणि किशनगड पोलीस ठाणे, दिल्ली पोलिसांनी आरोपींना रिमांडवर घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
नोएडा पोलिसांकडून दोघांची चौकशी
- सेक्टर-२४ नोएडा पोलिस स्टेशनचे अधिकारी बुधवारी द्वारका येथील IFSC कार्यालयात पोहोचले आणि दोन्ही आरोपींची चौकशी केली.
- पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींची जवळपास तीन तास चौकशी केली.
- नोएडा पोलिसांनी आरोपीला रिमांडवर घेण्यासाठी अर्ज केला आहे.
- वादग्रस्त अॅपबाबत नोएडाच्या सेक्टर-२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- याशिवाय मुंबई पोलिसांनी बुधवारी दिल्ली पोलिसांशीही संपर्क साधला.