मुक्तपीठ टीम
सुडोकू खेळण्यात डोकं लावणाऱ्या कोट्यवधींच्या मनाला चटका लावणारी बातमी आहे. सुडोकू या कोडे खेळाला लोकप्रिय बनवणारे माकी काजी (६९) यांचे निधन झाले. सध्या जगातील १०० पेक्षा जास्त देशांत सुडोकू खेळला जातो. या कोडे खेळाचे गॉडफादर म्हणून त्यांची ओळख होती. काजी यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरून ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जपानमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
यूलरच्या संख्या कोड्याला काजींनी लोकप्रिय बनवलं!
- संख्या कोड्याचा शोध स्विस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर यांनी १८ व्या शतकात लावला होता.
- पण काजींनी ‘सूडोकू’ नावाने ते लोकप्रिय बनवले.
- १९८० मध्ये त्यांनी त्याला आपल्या मॅगझिनमध्ये स्थान दिले.
- लोकांना ते एवढे आवडले की, पुढे त्याची डिजिटल आवृत्ती आणावी लागली.
- २००६ पासून दरवर्षी त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येऊ लागली. त्यातही काजींना बोलावले जात होते.
काजींनी सुडोकूला कसे बनवले लोकप्रिय?
- १९५१ मध्ये सेपोरात जन्मलेल्या काजींनी हायस्कूलनंतर कियो विद्यापीठात प्रवेश घेतला.
- पण १९७० मध्ये जपान-अमेरिका सुरक्षा कराराच्या विरोधामुळे अनेक वर्ग रद्द झाले.
- काजींना शिक्षण सोडावे लागले आणि ते एका प्रिंटिंग कंपनी काम करू लागले.
- यादरम्यान एका अमेरिकी मॅगझिनमध्ये नंबर गेमचे हे कोडे त्यांना दिसले.
काजींनी सुरु केले कोड्यांचं मासिक
- १९८० मध्ये त्यांनी मित्रांसोबत जपानचे पहिले कोड्यांचे मॅगझिन ‘पझल सुशिन निकोली’ हे सुरू केले.
- त्याच मॅगझिनमध्ये ‘आकड्यांनी एकाकी राहावे, अविवाहित’ या नावाच्या शीर्षकासह कोडे सुरू केले.
- त्याचे ‘सुडोकू’ हे संक्षिप्त नाव खूप लोकप्रिय झाले.
- १९८३ मध्ये त्यांनी निकोली कंपनीची स्थापना केली.
- काजींनी त्रैमासिक पझल मॅगझिनमध्ये कोडी बनवणे सुरू केले.
- ती कोडी फक्त कर्मचाऱ्यांनी तयार केलेलीच नव्हती तर प्रशंसकांच्या कल्पनेची मदत घेऊनही नवी कोडी तयार करण्यात आली.
- त्यामुळे जपानच्या पुस्तकांच्या दुकानांत पझल कॉर्नर दिसू लागले.
जपानमधून जगभर पसरले ‘सुडोकू’!
- २००४ मध्ये ब्रिटिश पर्यटकाने जपान दौऱ्यात ते पाहिले आणि ‘द टाइम्स’ पेपरमध्ये त्याला स्थान दिले.
- कोड्यांत दडलेला आनंद समजावून सांगण्यासाठी काजींनी ३० पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला.
- सुडोकू चॅम्पियनशिपने १०० देशांतील २० कोटींवर लोकांना आकर्षित केले, असा निकोलीचा दावा आहे.
- आता तर अनेक वर्तमानपत्रांत शब्दकोड्यांच्या जोडीला सुडोकूही छापलेलं दिसतं.
- मोबाईलवरदेखील आता सुडोकूसाठी अनेक गेम्स उपलब्ध असून मेंदूच्या विकासाला गती देणारा खेळ म्हणून याकडं पाहिलं जातं.