मुक्तपीठ टीम
कोरोना संकटामुळे राज्यातील गरीबच नाहीत तर सर्वसामान्यांचंही आर्थिक कंबरडं मोडलं गेलं आहे. कोरोना बाधा झालेल्या कुटुंबांवर दिवाळखोरीसारखी परिस्थिती ओढवली आहे. तरीही लॉकडाऊनच्या काळातही शाळा, महाविद्यालयांकडून फी वसुलीसाठी तगादा लावला जातो आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी खदखदत आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (AISF) या नाराजीकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. पण आता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी पुढचं पाऊल उचलत थेट मुंबईत धडक देण्यात येणार आहे. ५ जुलैला मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. लोकांचा खिसा कोरोनानं फाटला असताना सरकारनंच विचार करावा की फी कुठून भरणार, असा रोकडा सवाल विचारला जात आहे.
काय आहे AISF चं म्हणणं?
- लॉकडाऊनच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले.
- चाकरमान्यांपासून, मजुरी करणाऱ्यांपर्यंत सर्वांचे हाल झाले.
- त्यात पाल्यांच्या शिक्षणाच्या खर्चाने सर्व जण बेजार झालेत.
- शिक्षण घेणं अवघड झालेलं असताना फी वसुलीसाठी तगादा लावला जातोय.
- याचा विचार करता सरकारने त्वरित सरसकट शैक्षणिक फी माफ करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
AISF चा आंदोलनाचा इशारा
- नाशिकमधल्या आंदोलनात संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
- आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
- मागण्या मान्य करा, अन्यथा ५ जुलैला मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.