मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. याच संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ ते ०८ ऑक्टोबर, २०२१ व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ सप्टेंबर, २०२१ ते १२ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाअसून त्याची कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल कुठे पाहणार?
वेबसाइट
www.mahresult.nic.in
निकाल कसा पाहाल ?
- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mahresult.nic.in वेबसाईटवर जा.
- तेथे SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
- त्यानंतर खालील रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M143723 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव मेघना असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M143723 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच MEG असे लिहावे लागेल.
- यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे.
- विद्यार्थ्यांना निकालाचे प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
गुणपडताळणी ऑनलाईन-ऑफलाईन सुविधा उपलब्ध
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर 2021 ते शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवार, दिनांक 21 ऑक्टोबर 2021 ते मंगळवार 9 नोव्हेंबर 2-21 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.