मुक्तपीठ टीम
कोरोना संकटामुळे देशातील अनेक राज्यांप्रमाणेच विमानतळांवरही अनेक निर्बंध लागू झालेले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवास नियोजनात बदल होत आहेत. त्यामुळे काही विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही शुल्कांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पाईसजेट घेणार नाही अतिरिक्त शुल्क
स्पाईसजेट या विमान कंपनीनेही प्रवाशांचे अतिरिक्त शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता पाच दिवसांपूर्वीच्या तिकिटांच्या तारखांमध्ये किंवा वेळेत बदल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क प्रवाशांकडून आकारणार नाही. यापूर्वी ही सूट किमान ७ दिवसांपूर्वी झालेल्या फेरबदलासाठी होती. नवीन योजनेअंतर्गत १७ एप्रिल ते १० मे दरम्यान प्रवासी उड्डाणांसाठी तिकीट आरक्षित करणार्या प्रवाशांना एकवेळ बदल शुल्कात सूट मिळू शकते. कोरोनामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावल्यामुळे विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
इंडिगो ही ३० एप्रिलपर्यंत नाही घेणार शुल्क
याआधी इंडिगो कंपनीने देशांतर्गत तिकिटांसाठी वेळ किंवा तारीख बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. कंपनी १७ एप्रिलपासून ते ३० एप्रिल २०२१ कालावधीत आरक्षणात बदल केल्यास कंपनी कोणतेही शुल्क घेणार नाही.
विमानतळावर कडक निर्बंध
- नागरी उड्डान संचालनालय (डीजीसीए) देखील कोरोना रोखण्याबाबत कठोर पाऊले उचलत आहे.
- कोरोना नियमांचे उल्लंघन करत विमानतळावर पकडल्यास दंड आकारला जाऊ शकतो असा इशारा महासंचालनालयाने दिला आहे.