मुक्तपीठ टीम
अवजड व्यावसायिक वाहनं चालवणाऱ्या ट्रक चालकांसाठीही कामाचे ठराविक तास असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले आहे. विमान चालवणाऱ्या पायलटप्रमाणेच ट्रकसारखी अवजड वाहनं चालवणंही जबाबदारीच काम असतं, त्यामुळे त्यांनी ही कल्पना मांडली आहे. चालकांवरील दबाव कमी झाला तर दमल्याने होणारे रस्ते अपघात कमी होतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या स्वीकृत सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी व्यावसायिक वाहनांना ऑन बोर्ड स्लिप डिटेक्शन सेंन्सर्स बसवण्याच्या युरोपियन देशांमधील मानकांसारख्या धोरणावर काम करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दर दोन महिन्यांनी भेटून या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी परिषदेला दिले. जिल्हा रस्ते समितीच्या बैठकाही नियमित व्हाव्यात म्हणून आपण मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे लिहिणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
मंत्रालयाने २८/०७/२०२१ ला नवीन राष्ट्रीय रस्ते सुरक्षा समिती तयार केली होती. या बैठकीला तेरा स्वीकृत सदस्य उपस्थित होते. रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री वि के सिंग या बैठकीला मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते. रस्ते सुरक्षेच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासंदर्भात विविध महत्वपूर्ण सुचना सदस्यांनी केल्या.
रस्त्यावरील अपघातात होणारी प्राणहानी टाळण्यासाठी रस्ते सुरक्षेच्या विविध क्षेत्रावर काम करण्याच्या सूचना मंत्र्यांनी यावेळी सदस्यांना दिल्या. एकमेकांच्या कल्पनांची विचारांची देवाणघेवाण करण्याची विनंतीही सदस्यांना करण्यात आली. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या सदस्यांच्या सहकार्याने काम करण्याच्या आणि त्यांच्या सूचना प्राधान्यक्रमाने अमलात आणण्याचे निर्देशही त्यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दिले. रस्ते सुरक्षा क्षेत्रातील कामगिरी मासिकातून नजरेस आणली जाणार आहे.