मुक्तपीठ टीम
श्री काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तर अनेक विशेष पाहुण्यांनाही या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पाहुण्यांसाठीचे निमंत्रण पत्र देखील खूप खास आहे. यामध्ये काशी विश्वनाथ मंदिराचा ३५० वर्षांचा इतिहास, तसेच आजपर्यंतच्या प्रवासाची माहिती देण्यात आली आहे.
या निमंत्रणपत्रिकेमध्ये पौराणिक कथा तसेच श्री काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास समाविष्ट आहे. अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सांगितले की, वाराणसी देवाधिदेव महादेव ही भगवान शंकर यांची नगरी म्हणून जगभर प्रसिद्ध असल्याचे निमंत्रण पत्रात लिहिले आहे. याला सामान्य भाविक काशी असेही म्हणतात.
आजही भगवान शिव काशीमध्ये विराजमान आहेत. मोक्षदायनी माँ गंगेचे दर्शनही येथे करता येते. सनातन हिंदू धर्माचे केंद्र म्हणून, बौद्ध आणि जैन पंथातील सिद्धांनी, तसेच ऋषी, योगी आणि नंतरच्या अभ्यासकांनी वाराणसीला त्यांच्या आध्यात्मिक साधनेचे आणि सिद्धीचे केंद्र बनवले. काशीमध्ये विराजमान असलेल्या बाबा विश्वनाथांचे बाराव्या ज्योतिर्लिंगात महत्त्वाचे स्थान आहे. मध्ययुगीन काळात मुघलांनी या पवित्र स्थानाचे मोठे नुकसान केले होते. इसवी सन १७७७-७८ मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर परिसराची पुनर्बांधणी केली होती. पुढे १९व्या शतकात महाराजा रणजित सिंह यांनी मंदिरावर सुवर्ण शिखर बसवले होते.
निमंत्रणपत्रिकेत पुढे लिहिले आहे की, जवळपास २०० वर्षांनंतर, भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे संसदेत काशी लोकसभा मतदारसंघाचंदेखील प्रतिनिधित्व करतात, यांनी श्री काशी विश्वनाथ धामचे नूतनीकरण करून काशीच्या प्राचीन आत्म्याचे जतन केले आहे.