मुक्तपीठ टीम
एलॉन मस्कची कंपनी स्पेसेक्सने इतिहास घडवला. त्यांच्या नव्या आणि आजवरच्या सर्वात मोठ्या रॉकेटने यशस्वीरीत्या उड्डाण केले आणि तिसऱ्या प्रयत्नात पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँडही झाले. स्पेसेक्स टीमनं मिशन यशस्वी झाल्याची घोषणा केली आणि दहा मिनिटातच रॉकेटचा स्फोट झाला. रॉकेटचा स्फोट का झाला, त्याचा आता शोध घेतला जात आहे.
बुधवारी अमेरिकेतील टेक्सासमधील बोका चिकामधून स्पेसेक्सच्या रॉकेटने उड्डाण केले. स्टारशिप एसएन-१० हे रॉकेट १० किमी उंचीपर्यंत गेले. त्यानंतर नियोजनाप्रमाणे ते परत आले. तिसऱ्या प्रयत्नात रॉकेटचे यशस्वी लँडिंग झाले. स्पेसेक्सच्या टीमने आनंदही साजरा केला. मात्र, अवघ्या दहा मिनिटातच रॉकेटचा स्फोट झाला.
आतापर्यंत या स्फोटाविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एलॉन मस्क यांनीही रॉकेटच्या यशस्वी लँडिंगनंतर प्रथमच रॉकेट नष्ट न होता पृथ्वीवर परतल्याबद्दल आनंद व्यक्त करणारे ट्विट केले. आता या स्फोटाची चौकशी केल्यानंतरच कारण कळू शकेल.