मुक्तपीठ टीम
स्पेस स्टेशनमध्ये पिझ्झा पार्टी. अंतराळवीरांसाठी, अंतराळवीरांनी आयोजित केलेली. अंतराळात प्रवास करणं खूपच रोमांचक असते आणि त्यांची ही स्पेस पिझ्झा पार्टीही तशीच रोमांचक. व्हिडीओ पाहिला तर पिझ्झा दिसतात. पण ते उभे पकडूनही टॉपिंग्स मात्र पडत नाही. काटे चमचे अगदी टाचेवर ऐटीत उभे. कसलाही आधार न घेता. अंतराळवीरांच्या या पिझ्झा पार्टीमागे उद्देश होता तो सर्वांनाच मनासारखं जगण्याची संधी देण्याचा. व्हिडीओवरून तो धमाल उद्देश साध्य झाल्याचं दिसतंय.
अंतराळात वावरताना कठोर परिश्रम करावे लागतात. त्याचवेळी आपल्या आवडत्या वस्तू खाण्या-पिण्यावर बंधनंही असतात. परंतु अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पिझ्झा पार्टी करत असलेल्या अंतराळवीरांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात अंतराळ स्थानकात पिझ्झा खाऊन अंतराळवीर मज्जा करताना दिसत आहेत. पृथ्वीवर पिझ्झा पार्टी करणे तसं पाश्चात्य देशांमध्येच नाही आता आपल्या शहरी भागांमध्येही नेहमीचं झालं आहे, परंतु स्पेस स्टेशनमध्ये पिझ्झा पार्टी ही एक विलक्षण गोष्ट आहे आणि ज्याने हा व्हायरल व्हिडीओ पाहिला ते त्यातील गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे असणारे दृश्य पाहून आश्चर्यचकितच झाले.
अशी झाली तरंगती पिझ्झा पार्टी!
- अंतराळवीर थॉमस पेस्केटने अंतराळ स्थानकात पिझ्झा पार्टीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.
- एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये सहा अंतराळवीरांचा एक गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) ‘फ्लोटिंग पिझ्झा पार्टी’चा आनंद घेताना दिसत आहे.
- व्हिडीओमध्ये तो पिझ्झामधील अन्न पदार्थ एकत्र करत आणि हवेत तरंगत पिझ्झा बनवतानाही दिसत आहे.
- अंतराळवीर थॉमस पेस्केटने व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले, “मित्रांसोबत फ्लोटिंग पिझ्झा नाईट, पृथ्वीवरील शनिवार सारखे वाटते. चांगले शेफ कधीही त्याचे रहस्य उघड करत नाहीत, परंतु मी एक व्हिडिओ बनवला आहे तो पाहून तुम्ही ठरवू शकता.”
अंतराळातील पिझ्झा पार्टी जबरदस्त व्हायरल
- अंतराळातील पिझ्झा पार्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
- आतापर्यंत हा व्हिडीओ ७०२,८१९ वेळा पाहिला गेला आहे.
- या व्हिडीओला १,३७,९७७ लाईक्स मिळाले आहेत.
- अंतराळातील पिझ्झा पार्टीचे हे आश्चर्यकारक दृश्य पाहून लोकही आश्चर्यचकित आहेत.
- एका युजरची प्रतिक्रिया: “स्पेस पिझ्झा छान आहे. अंतराळात पिझ्झा बनवणे हे एक आव्हान आहे. पिझ्झा बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहून आनंद झाला.”