मुक्तपीठ टीम
ग्राहक-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची, भारतीय सशस्त्र दलांना व त्यांच्या पूरक सेवांना सेवासुविधा पुरवणारी स्टार्ट-अप कंपनी ‘उडचलो’ने बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड युनिकॉर्न समिटमध्ये “सूनिकॉर्न” (सून टू बी युनिकॉर्न) पुरस्कार पटकावला आहे. अभिनव व्यवसाय संकल्पना, लाभदायक बिझनेस मॉडेल आणि या कंपनीची सध्याची लाभदायिकता यामुळे ‘उडचलो’ इतर नामांकनांपेक्षा सरस ठरली आहे. कर्नाटक राज्याचे माननीय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत ‘उडचलो’चे संस्थापक व सीईओ रवी कुमार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी निवड होण्याआधी उडचलोने ज्युरी स्क्रीनिंगच्या दोन फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. प्रवेशिकेच्या आधारे प्राथमिक तपासणी करण्यात आली होती, दुसऱ्या फेरीमध्ये संस्थाकांसोबत एक्सक्लुसिव्ह व्हर्च्युअल इंटरॅक्शन करण्यात आले. या दोन फेऱ्यांच्या निकालाच्या आधारे या पुरस्कारासाठी ‘उडचलो’ची निवड करण्यात आली. ज्युरी टीममध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता – इंडियन एन्जल नेटवर्कच्या सह-संस्थापिका श्रीमती पद्मजा रुपारेल, ओरिओस व्हेन्चर पार्टनर्सचे मॅनेजिंग पार्टनर श्री. अनुप जैन, बीसीजी इंडियाचे एमडी श्री. सौरभ चंद्रा, एडेलविस प्रायव्हेट इक्विटीचे मॅनेजिंग पार्टनर व हेड श्री. प्रणव पारीख, इंडिफी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक व सीईओ श्री. अलोक मित्तल, कू ऍपचे सह-संस्थापक व सीईओ श्री. अप्रमेय राधाकृष्ण, आयआयटी गोवाचे कुलगुरू (आरअँडडी) प्रो. बिद्याधर सुबुद्धी, आयआयटी भिलाईचे संचालक प्रो. रजत मूना आणि भारत फंडचे पार्टनर संजय जैन.
उडचलोचे सीईओ रवी कुमार म्हणाले, “आमच्या संपूर्ण टीमला देशाच्या सशस्त्र बलांप्रती जो आदर वाटतो त्यामधून आणि या कामाविषयी आत्यंतिक आवडीमधून ‘उडचलो’ची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या देशाच्या सैनिकांसाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्यासाठी जे अल्प योगदान देऊ शकलो आहोत त्यांचा सन्मान होत असल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. ‘उडचलो’ची सुरुवात झाल्यापासूनच आम्हाला आमच्या स्वप्नावर विश्वास होता आणि आता “सून टू बी युनिकॉर्न” हा पुरस्कार मिळाल्यामुळे येत्या भविष्यकाळातील उंच भरारीसाठी आत्मविश्वासाचे प्रचंड बळ आम्हाला मिळाले आहे.”
भारतीय सशस्त्र दले व त्यांच्या पूरक सेवांमधील २.८ मिलियनपेक्षा जास्त ग्राहक उडचलो च्या सेवांचा लाभ घेत आहेत. १० वर्षात उडचलो ने सैनिकांना ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवा सर्वात स्वस्त दरात मिळाव्यात यासाठी एक अनोखा, सुविधाजनक व प्रभावी प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे.
बीडब्ल्यू युनिकॉर्न समिट अँड अवॉर्ड्स २०२२ ही अशाप्रकारची पहिली दोन दिवसीय जागतिक शिखर परिषद आणि पुरस्कार समारोह आहे, ज्याठिकाणी विविध स्टार्ट-अप्सना पुरस्कार दिले जातात आणि भारतातील स्टार्ट-अप इकोसिस्टिममधील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाते.