मुक्तपीठ टीम
देशातील कोरोना महामारीची भीषणता वाढत चाललेली असतानाच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर भेदभावाचे आरोप होत आहेत. उपचारांच्या अभावामुळे लोकांचे बळी जात असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमधील निवडणूक प्रचारात गुंतले असल्यामुळे वाढती टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली आहे. काँग्रेस कार्य समितीची सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी मोदींना राजधर्म सांगितला.
देशभरात कोरोनाचं सावट वाढलं असून राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक बोलावून त्यात देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका केली आहे. कोरोना महामारीला वर्ष झाल्यानंतरही सरकार गाफील असल्याचे सांगून सोनिया गांधी यांनी लसीकरणाची वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत करण्याची मागणीही केली आहे.
राजकारणापलिकडे जाऊन कोरोनाचा भारतीय म्हणून सामना हाच राजधर्म!
- कोरोना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काँग्रेसने कायम घेतली आहे.
- भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे.
- कोरोनाच्या आव्हानाचा राजकारणापलीकडे जाऊन राजकीय प्रतिस्पर्धेऐवजी एक भारतीय म्हणून सामना करणे हाच खरा राजधर्म असेल, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
आपल्याच देशात हजारो लोक लस मिळत नसल्याने मरत असून दुसऱ्या देशांना मदत करून आपण किती उदार आहोत, हे दाखवण्याचा देशाला कसा फायदा होणार, असा सवालही सोनिया गांधींनी केला.
राहुल गांधींची टीका
- कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीत मोदी सरकारला लक्ष्य केले.
- कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारकडे कोणतीही रणनीती नाही.
- ना लसीकरणाची ना ऑक्सिजन पुरवठ्याची, असे राहुल गांधी म्हणाले.
या आधी नरेंद्र मोदींना कुणी सांगितला होता राजधर्म? वाचा:
अटलबिहारी वाजपेयींनी सांगितला होता नरेंद्र मोदींना ‘राजधर्म’!