अनंत साळी
महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. लवकरच विजयही होणारच. या लढाईत महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते हिरीरीने सहभागी झालेत. प्रत्येक आपली जबाबदारी पार पाडत आहे. एकीकडे जिवंत रुग्णांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न तर दुसरीकडे कोरोनानं मृत्यू पावलेल्यांच्या सन्मानानं अंत्यविधीतील अनेक समस्या. कुठे स्मशानभूमीची तर कुठे दहनासाठी लागणाऱ्या लाकडांची. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना आणि कोकणातील चिपळूणच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वत:च त्यावर तोडगा काढलाय.
सध्या जालना शहरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून रोज मृत रुग्णांचे मृतदेह मुक्तिधाम येथे आणून नगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. मंठा बायपास वर असलेल्या या मुक्तिधाम मध्ये एकच शेड असल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार जवळजवळ किंवा जमिनीवर करावे लागतात. मृतदेह जास्त असल्याने अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगीचे चटके बसतात तसेच एक अंत्यविधी होईपर्यंत दुसऱ्या मृतदेहाला वेटींग वर ठेवावे लागत आहे. असं घडू नये, यासाठी जालना येथील अनोखा गणेश मंडळाचे अध्यक्ष जगदीश भरतीया यांनी पुढाकार घेत तीन लाख रुपये खर्चून एक शेड उभारून दिली आहे. आता दोन चितांमध्ये अंतर ठेवून मृतदेह जाळता येतील तसेच पावसाळ्यात हे खूप उपयोगी ठरेल. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची गैरसोय टळणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढाकार घेत असे उपक्रम राबवले तर कोरोना काळात कित्येक सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी होऊ शकतात हा संदेश महत्त्वाचा.
एकीकडे जालन्यात स्मशानभूमीत शेडची सोय. तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील साईधाम मित्र मंडळाने अंत्यविधीला लाकडे कमी पडू नयेत, व्यवस्थित दहन व्हावे यासाठी रामतीर्थ स्मशानभूमीत बारा टन लाकडे पुरवली आहेत.
आपत्ती येते. तोंड द्यावेच लागते. पण आपापल्या परीने समाजासाठी पुढे सरसावलेल्य या सामाजिक कार्यकर्त्यांना मुक्तपीठ टीमकडून मनापासून धन्यवाद! आपल्याही माहितीत कुणी चांगले कार्य करत असेल तर ९८३३७९४९६१ या क्रमांकावर कॉल करून नक्की कळवा.
पाहा व्हिडीओ: