मुक्तपीठ टीम
राजकीय स्वार्थासाठी पक्षांतरे करीत विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बसलेल्या नीलम गोऱ्हे आता खुर्ची टिकविण्यासाठी ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्याची धडपड करत असून महिलांवरील अत्याचाराबाबत मात्र त्यांनी तोंडास कुलुप घातले आहे. स्त्री हक्काचा आधार घेत राजकीय बस्तान बसविणाऱ्या नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे पोटदुखी होऊन ठाकरे सरकारने त्यांना केलेल्या अटकेनंतर नीलम गोऱ्हे यांची जीभ घसरली, आणि त्यांनी राजकीय शेरेबाजी केली. आपली खुर्ची शाबूत राखण्यासाठी ठाकरे कुटुंबाची खुशामत करणे गरजेचे असल्याने तसे करताना आपल्या पदाच्या जबाबदारीचे भानदेखील नीलम गोऱ्हे यांना राहिले नाही. विधान परिषदेचे उपसभापतीपद हे पक्षनिरपेक्ष असले पाहिजे. मात्र ठाकरे यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना आपल्या पदाच्या प्रतिष्ठेचेही भान राहिले नाही. राज्यात दररोज महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध बोलताना त्यांच्या तोंडास कुलुप बसते. केवळ ठाकरे यांची मर्जी सांभाळण्याकरिता महिलांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या गोऱ्हे यांनी हिंमत असेल तर राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचारांचे पाढे सरकारसमोर वाचावेत असे आव्हान वाघ यांनी दिले.
सत्ताधारी आघाडीचे मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडूनच राज्यातील महिलांवर अत्याचार होत असताना ठाकरे सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई होत नाही. भर रस्त्यात सरपंचपदावरील महिलेस मारहाण होते, अधिकारी महिलेवर वार करून तिची बोटे छाटली जातात, गरीब मजूर महिलेचे अपहरण होते, अल्पवयीन बालिकांवर सामूहिक बलात्कार होतात, महिलांचे खून होतात, आणि मूग गिळून बसलेल्या नाकर्त्या सरकारच्या सुरात सूर मिसळून विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे मात्र, राजकारण करून शेरेबाजी करत महिलांवरील भीषण अत्याचारांबाबत मात्र मूग गिळून बसतात, हे आश्चर्यकारक आणि लाजीरवाणे आहे, असे त्या म्हणाल्या.