दोन दिवसांपूर्वी मालवणी परिसरातून झालेल्या एका एक वर्षांच्या मुलीचे अपहरणाच्या गुन्ह्यांचा अवघ्या ४८ तासांत मालवणी पोलिसांनी छडा लावून अपहरण करणार्या २४ वर्षांच्या महिलेस ठाणे येथून अटक केली आहे. सफाला बिपीन नायक असे या महिलेचे नाव असून तिला शनिवारी बोरिवलीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुलाची आवड असल्याने तिने या मुलीचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मुलीला घेऊन ती ओडीसाला जाणार होती, मात्र त्यापूर्वीच तिला पोलिसांनी अटक केली.
सफाला ही मूळची ओडिसाची रहिवाशी आहे. काही वर्षांपासून ती मुंबई शहरात घरकाम म्हणून काम करीत होती. तीन दिवसांपूर्वी ती मालाडच्या मालवणी परिसरात आली होती, तिथेच तिची ओडिसाची एक मैत्रिण राहते, तिच्याकडे काहीच काम नव्हते, त्यामुळे तिने तिच्याकडे राहण्याची विनंती केली होती, मात्र या मैत्रिणीने तिच्या परिचित तक्रारदारांकडे तिची दोन दिवस राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांनीही तिला त्यांच्या घरी ठेवून घेतले होते. ६ जानेवारीला रात्री साडेआठ वाजता ती त्यांच्या एक वर्षांच्या मुलीला घेऊन बाहेर गेली होती, आम्ही दोघेही फेरफटका मारुन येतो असे सांगून गेलेली सफाला ही बराच वेळ होऊन घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता, या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती.
सफालाकडे मोबाईल होता, तिने मोबाईलवरुन दोन ते तीन कॉल केले होते, त्यावरुन पोलिसांनी तिचे लोकेशन काढले, या लोकेशनवरुन ती ठाण्यात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन रजाणे, गुन्ह शाखेचे अधिकारी हसन मुलानी, अशोक लांडगे, सुधीर चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक उषा खोसे, डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार तिवारी, कदम, चौधरी, पोलीस नाईक मगदुम, बुगडे, हिरेमठ, बडतकर, पोलीस शिपाई गोंजारी, मोरे, भुजबळ, शिंदे, भंडारे, नवले, शिंदे, उगले यांनी ठाणे येथील हिरानंदानी परिसरात सफाला नायक हिला शिताफीने अटक केली. तिच्या ताब्यातून पोलिसांनी या मुलीची सुटका करुन तिला नंतर तिच्या पालकांकडे सोपविले होते.
अटकेनंतर तिला पुढील चौकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात आणले, सध्या तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे, प्राथमिक तपासात सफाला ही विवाहीत असून तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे, गेल्या तीन वर्षांपासून ती मोलकरीण तसेच लहान मुलांना सांभाळण्याचे काम करीत होती, तिला मुलांची आवड होती, ती नेहमीच मोबाईलवर लहान मुलांचे व्हिडीओ पाहत होती, तिला एका मुलाची गरज होती, त्यामुळे तिने या मुलीचे अपहरण केले होते, अपहरणानंतर ती ठाणे रेल्वे स्थानकात ओडीसाला जाण्यासाठी आली होती, मात्र तिची ओडिसाला जाणारी ट्रेन निघून गेली होती, त्यामुळे तिने एका मराठी जोडप्याची मदत घेतली होती, एक दिवसांसाठी तिला व मुलीला आश्रय द्या असे तिने त्यांना सांगितले होते, त्यानंतर ते जोडपे तिला तिच्या हिरानंदानी येथील घरी घेऊन गेले होते. तिथेच तिला नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.