मुक्तपीठ टीम
‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ २०२१ मध्ये महाराष्ट्राने ऊर्जा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’चा एक भाग म्हणून १८ जून २०२२ रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड इन पॉवर अँड एनर्जी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ऊर्जा विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रेय देत त्यांचे अभिनंदन केले आहे.
स्कॉच ग्रुपच्या वतीने दरवर्षी शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 18 जून 2022 रोजी सिल्व्हर ओक हॉल, इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
महापारेषणने ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी केला आहे. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्त्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन एचटीएलएस कंडक्टरचा उपयोग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. मोनोपोल मनोऱ्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वहिवाट मार्ग (Right of Way) समस्या कमी करण्यासाठी व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
एचव्हीडीसी योजनेअंतर्गत एकूण १ लाख २९ हजार ५४६ कृषीपंप ऊर्जान्वित केले. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एकूण ९९ हजार ७४४ कृषीपंप बसविण्यात आले. २४ एप्रिल २०२१ पासून सुरू झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे १२ हजार १०२ch घरगुती वीजजोडणी देण्यात आली.
कोरोना काळात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सातत्याने ऊर्जा कंपन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अखंडित व विक्रमी वीजपुरवठा झाला. सुयोग्य नियोजन केल्यामुळे तौक्ते, निसर्ग चक्रीवादळ, पूरपरिस्थितीतही विद्युतपुरवठा सुरळीत ठेवला. या पुरस्कारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.