मुक्तपीठ टीम
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिनीनेच हनी ट्रप लावून छोटा काश्मीर येथे भावाच्या मारेकर्याला बोलावून तिच्या सहकार्यांच्या मदतीने अपहरण घडवून आणले, अपहरणानंतर या टोळीचा आरोपीची हत्या करुन त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याची योजना होती, मात्र नाकाबंदीत सर्व आरोपी पकडले गेले आणि त्यांची अपहरण आणि हत्येची योजना फसली गेली आहे. अपहरणाच्या गुन्ह्यांत आरे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. मोहम्मद फारुख शेख, ओवेस नबीउल्लाह शेख, मोहम्मद मोनीस सय्यद, निहाल जाकीर खान आणि सत्यम शिवकुमार पांडे अशी या पाचजणांची नावे आहेत, या आरोपींकडून पोलिसांनी एक रुग्णवाहिका, एक इनोव्हा कार, तलवार, चॉपर आदी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. दुसरीकडे हत्येच्या गुन्ह्यांत सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मोहम्मद सादिक राशिक अन्सारी ऊर्फ मेंटल नवाब याला मालवणी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मोहम्मद सादिक हा नालासोपारा येथे राहत असून त्याचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यांचा पाव विक्रीचा व्यवसाय होता, मात्र हा व्यवसाय चालत नसल्याने त्याने व्यवसाय बंद केला होता. नालासोपारा येथील घर भाड्याने देऊन ते सर्वजण त्याच्या गावी निघून गेले होते. गावाहून परत येताच तो मालवणी परिसरात राहू लागला, तिथेच त्याची ओळख रेकॉर्डवरील गुन्हेगार शेरुशी झाली होती. ८ जूनला अल्ताफ अस्पाक अन्सारी या २४ वर्षांच्या तरुणाची या टोळीने हत्या केली होती. रिक्षा पार्किंगवरुन झालेल्या वादातून ही हत्या झाली होती, या हत्येनंतर मोहम्मद सादिक पळून गेला होता, याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद होताच काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, मात्र सात महिन्यांपासून मोहम्मद सादिक हा फरार होता. त्याचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
याच दरम्यान अल्ताफच्या बहिणीने मोहम्मद सादिकची सोशल मिडीयावर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, त्यात तिला यशही आले, बोगस अकाऊंट उघडून तिने त्याच्याशी मैत्री केली, त्याला शनिवारी दुपारी तीन वाजता गोरेगाव येथील आरे कॉलनी, छोटा काश्मीर येथे बोलाविले, त्याच्यासाठी तिने चिकण बिर्याणी बनविली असून ती देण्यासाठी ती येत असल्याचे सांगितले, शनिवारी मोहम्मद सादिक तिथे येताच पाचजणांच्या एका टोळीने त्याचे अपहरण केले, त्याला एका रुग्णवाहिकेतून पळविण्यात आले होते, या प्रकाराची एका दक्ष नागरिकाने मुंबई पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला दिली होती.
अपहरणाची माहिती मिळताच या माहितीनंतर सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत, पोलीस उपायुक्त दिलीप सावंत, पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे अधिकारी उल्हास खोलम, पोलीस नाईक वसंत उगले, गौतम बडे, अंबादास भाबड, पोलीस शिपाई समाधान डांगे, बिनल शिंगाणे, जानराव, काटे, थोरात, वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सातर्डेकर व पथक, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडाखे, उपनिरीक्षक तोटावर व पथक, दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने सर्वत्र नाकाबंदी सुरु केली होती. कांदिवली येथे आल्यानंतर रुग्णवाहिकेचे पेट्रोल संपले, त्यानंतर त्यांनी त्याला एका इनोव्हा कारमधून कोंबून दहिसर चेकनाक्याच्या दिशेने पळ काढला. याच दरम्यान नाकाबंदीमध्ये या पोलीस पथकाने या पाचही आरोपींना अटक करुन त्यांच्या तावडीतून मोहम्मद सादिकची सुटका केली.
चौकशीत यातील मोहम्मद फारुखचा पार्किंगचा व्यवसाय, मोहम्मद मोनिस हा चालक, निहाल हॉटेल व्यावसायिक तर ओवेस आणि सत्यम काहीच काम करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्ताफच्या बहिणीला मोहम्मद सादिकचे अपहरण करुन नंतर त्याची हत्या करायची होती, याकामी तिने अल्ताफच्या तीन मित्रांसह इतर दोघांची मदत घेतली होती. अपहरण, हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याची योजना तिचीच होती, तिने हनी ट्रपद्वारे मोहम्मद सादिकला सोशल मिडीयावर संपर्क साधून त्याच्याशी प्रेमाचे नाटक केले, तो छोटा काश्मीर येथे येताच त्याचे अपहरण केले. त्याला नायगाव येथे नेल्यानंतर त्यांना त्याची हत्या करायची होती, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन नायगाव फेंकून पुरावा नष्ट करायचा होता, मात्र अपहरण करुन त्याला नेत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली, त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला गेला आहे.
याच गुन्ह्यांत नंतर या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. सध्या ते सर्वजण पोलीस कोठडीत आहे. दरम्यान सादिक हा अल्ताफच्या हत्येतील वॉण्टेड आरोपी असल्याने त्याला पुढील चौकशीसाठी मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत अल्ताफच्या बहिणीला अटक झाली नसून तिची चौकशी सुरु आहे. लवकरच तिला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.