मुक्तपीठ टीम
आता लवकरच मोबाईलच्या दुनियेत एक हवीहवीशी क्रांती घडणार आहे. आतापर्यंत छोटी पिन, मोठी पिन, साधी पिन, सी पिन…अशा चार्जर भेदांमुळे त्रासलेल्या सर्व मोबाईल यूजर्सना खूश करणारी ही बातमी आहे. आता लवकरच सर्व स्मार्टफोनसाठी एकच USB-C चार्जरचा नियम अस्तित्वात येण्याची शक्यताय. त्यामुळे गॅजेट्ससाठीच्या चार्जरची किंमतही कमी होईल. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमुळे होणारे प्रदूषण देखील लक्षणीयरीत्या कमी होईल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या भारतीय बाजारात स्मार्टफोन, इयरबड्स, टॅब्लेट, गेमिंग कन्सोलसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी ६ विविध प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती देखील वाढतात. आता तेही टळेल.
युरोपियन आग्रहामुळे स्मार्टफोन चार्जरमधील भेदाभेद संपणार
- युरोपियन युनियनने अलीकडेच सर्व डिव्हाइससाठी एकाच प्रकारचे USB-C चार्जर अनिवार्य केले आहे आणि लवकरच ते बाजारात आणले जाईल.
- युरोपियन युनियनचा असा दावा आहे की जर सार्वत्रिक USB-C चार्जर नियम लागू झाला तर दरवर्षी निर्माण होणारा ११,००० टन इलेक्ट्रॉनिक कचरा थांबेल.
- म्हणूनच युरोपियन युनियनने (EU) सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी USB-C चार्जर वापरण्याचे आदेश देणारा ठराव पारित केला आहे.
भारतालाही मिळणार फायदा
- भारत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि उपकरणांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे.
- युरोपियन युनियनच्या या निर्णयामुळे त्याचा फायदा भारतातही होईल.
- आपल्या देशातही लवकरच एकाच USB-C चार्जरचा नियम लागू होऊ शकेल.
- स्मार्टफोन निर्मात्यांना दोन वर्षांच्या आत अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल.
अॅप्पलचा एकसमान चार्जरला विरोध
- अॅप्पल कंपनीने युनिव्हर्सल यूएसबी-सी चार्जर लागू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.
- अॅप्पलच्या मते असे केल्याने नवीन शोधांचे प्रयत्न थांबतील.
सध्या फक्त स्मार्ट फोन आणि लहान गॅजेटसाठीच
- काही तज्ञांनी वायरलेस चार्जिंग हा एक चांगला पर्याय असल्याचा दावा केलाय.
- USB-C चार्जरचा नवीन नियम केवळ स्मार्टफोन आणि लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी लागू होईल.
- सध्या लॅपटॉप आणि इतर मोठ्या उपकरणांचा यात समावेश करण्यात आलेला नाही.