मुक्तपीठ टीम
संविधानाला कोणीही कदापि धक्का लावू शकत नाही, या भ्रमात दंग राहू नका. ते संविधान देशाच्या राजधानीत केंद्र सरकारच्या देखत जाळले गेले आहे, असे सांगतानाच देशातील लोकशाही वाचवण्यासाठी गाफीलपणा आजच सोडा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( सेक्युलर) चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांनी येथे केले.
मुरबाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी रिपाइं (सेक्युलर) ची तालुका शाखा आणि लोकनेते दिलीप चंदने सेवाभावी संस्था यांनी आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात ते बोलत होते.
भांडवलशाही आणि ब्राह्मण्यशाही हे दोन देशाचे प्रमुख शत्रू आहेत, असे बाबासाहेबांनी बजावले होते, याची आठवण करून देत गायकवाड म्हणाले की, त्या दोन्ही शक्तींनी हातमिळवणी करून सारा देश आता विकायला काढला आहे. त्या विरोधात फक्त दलितांनीच नव्हे तर समस्त शोषित वर्गाने आणि कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक यांनी निर्णायक एल्गार करण्याची वेळ आली आहे.
हा एल्गार उभा राहू नये, यासाठीच हिजाब आणि भोंग्यासारखे विषय पुढे आणून धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी यावेळी केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बँकिंग, वाहतूक यासारखे सेवा उद्योग आणि खनिज उद्योग हे सरकारच्याच मालकीचे राहिले पाहिजेत, यावर कायम भर दिला होता. पण केंद्रातील मोदी सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावून नफ्यातील सरकारी उद्योगही भांडवलदारांच्या घशात घालण्याचा विडा उचलला आहे, असे श्यामदादा गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले.
नामवंतांना पुरस्कार प्रदान
या जयंती महोत्सवात विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केलेल्या नामवंतांना श्यामदादा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात दिवंगत डॉ. दिलीप धानके ,(जन क्रांती संघटना )शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच अँड. किरण चंन्ने (भिमा कोरेगांव चौकशी आयोग ) कारगिल विजेते निवृत मेजर विट्ठल यादव बांगर (अकोले अहमदनगर) ,सत्यशोधक चळवळीतील जेष्ठ नेते प्रा शरद ताजणे(ओतूर पुणे ,)आदिवासी चळवळीतील लढाऊ नेत्या कॉम्रेड कविताताई वरे(पारगाव मुरबाड.) , समृध्दी महा मार्गाच्या न्यायासाठी लढणारे सिंधूताई सकपाळ यांचे मानस पुत्र बबन हरणे (शहापूर ठाणे.), संभाजी ब्रिगेड चिंचवड शहर अध्यक्ष. सतीश काळे( पुणे.), दलित चळवळीतील अग्रणी, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांचा समावेश आहे.
यावेळी राष्ट्र संत गाडगे महाराज यांचे अनुयायी ,सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांचे किर्तन पार पडले,अशी माहिती समारंभाचे निमंत्रक आणि मुख्य संयोजक रवींद्र चंदने यांनी दिली.