शुध्दोधन कांबळे
शनिवार रात्री मी हमखास न चुकता चित्रपट पाहतो, कारण रविवारी लेट उठता येते. ब-याच दिवसांपासून “फॉरेस्ट गम्प” पाहायचा होता आणि काल बघितला आणि एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट बघितल्याचा आनंद मिळाला. हा चित्रपट नायक आणि नायिका यांची समांतर कहानी सांगतो, नायक त्याच्या आयुष्यातील शारीरिक आणि मानसिक समस्यांना साहसी तोंड देऊन जीवनात यशस्वी बनतो तर नायिका लहानपणीच्या कोवळ्या मनावर झालेल्या अघातामुळे आयुष्यभर पलायन करुन दुखःद शेवट करुन घेते. फॉरेस्ट गम्प हे नायकाचे नाव असून तो त्याच्या नावाप्रमाणेच अलग आहे, त्याच्या यशस्वी आयुष्यात त्याच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. जेनी हे नायिकेचे नाव असून तिच्या पलायनवादी स्वभावाला तिच्या बालपणी लैंगिक अत्याचार करणारा बाप जबाबदार आहे. या चित्रपटात आयुष्याकडे पाहण्याचा नायकाचा सकारात्मक तर नायिकेचा नकारात्मक दृष्टिकोन समांतर व तुलनात्मक पध्दतीने दर्शविण्यात आला आहे. चित्रपटाची सुरवात एक पक्षाचे पंख हवेत उडत असताना दाखवित होते जे फॉरेस्ट जवळ येऊन थांबते तर शेवटही तेच पंख हवेत उडतानाच्या दृश्य दाखवून होतो. या चित्रपटात नायक अस्तित्ववादी तत्त्वज्ञान सांगत, आपले आयुष्य त्या पंखा प्रमाणे कुठे आपल्या आयुष्याचा प्रवास जाईल हे सांगता येत नाही असे म्हणतो. या संवादावरुन निदा फाजली यांची खालील गझल आठवते,
“अपने मर्जीसे कहा अपने सफर पे हम है,
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम है!”
या चित्रपट पळणे हे सिम्बालीक दाखविले आहे, नायकाचे शारीरिक धावणे हे त्याला आतून मजबूत बनविण्यासाठी आहे तर नायिकेचे सतत मानसिक धावणे तिला आतून कमजोर करते. फाॉरेस्टला व्हिएतनामला युध्द करण्यासाठी पाठविले जाते, तिथे त्याला दोन जीवलग मीत्र भेटतात, ऐक बाबो , जो नेहमी झींगा पकडणे आणि झींगा खाणे यासंदर्भात बोलतो, तो फॉरेस्ट सोबत रिटायरमेंट नंतर झींगा पकडण्याचा व्यवसाय करण्याची योजना आखतो पण तो युध्दात मरण पावल्यानंतर फॉरेस्ट एकटाच त्याचे झींगा पकडण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण करतो, दुसरा मित्र लेफटनंट डॕन, ज्याला युध्दात जख्मी अवस्थेत फॉरेस्ट त्याला त्याच्या इच्छे विरुध्द वाचवितो. लेफटनंट डॅनचा फॉरेस्टवर राग असतो कारण तो युध्दात जख्मी हैऊन त्याचे दोन्ही पाय त्याने गमाविलेले आहे, तो अपंग होऊन आयुष्य जगण्यापेक्षा मरण चांगले या विचाराचा असतो पण त्याचे हे विचार पुढे बदलतात आणि तो त्याचे उर्वरित आयुष्य सुखाने घालवितो. लेफटनन डॅन, फॉरेस्टला अपंग असतानाही झींगा पकडण्याच्या व्यवसायात बोटीवर मदत करतात. एका दृश्यात ते म्हणतात, “फॉरेस्ट, मी तुझे माझा जीव वाचविल्याबद्दल आभार व्यक्त केले नाही पण आज मी तुझे आभार मानतो.” असे म्हणून तो समुद्रात पाय नसतानाही पोहण्यासाठी उडी मारतो, या दृश्यातून लेफटनन त्याचे आयुष्य त्याच्या कमतरतेसह जगण्यासाठी तयार झाला आहे , हे दाखविले जाते. फॉरेस्ट गम्पचा आय. क्यू. कमी असूनही तो त्याचे साधारण आयुष्य असाधारण बनवितो, हाच या चित्रपटाचा संदेश आहे. स्वतःच्या मर्यादेपलिकडे जाऊन जीवन जगण्याचा सकारात्मक संदेश हा चित्रपट देतो.
हा चित्रपट विन्संट ग्रुम यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे, या चित्रपटात नायकाच्या कहानी बरोबर अमेरीकेतील ऐतिहासिक घटनांचा संदर्भ येतो, निग्रो लोकांचे आंदोलन , राष्ट्रपतीच्या झालेल्या हत्या, सीवील वार आणि समाजवादी लोकांची अंदोलन यासारख्या घटनासोबत नायकाच्या आयुष्याचा उलगडा केला जातो. या चित्रपटाचे कथन करण्याची पध्दत साधारण आहे, फॉरेस्ट जेनी ला भेटायला जात आहे आणि तो एका ठिकाणी बसची वाट पाहत आहे, जो कोणी त्याच्या बाजूला आहे त्याला तो आपली कहानी सांगत आहे. ज्याना त्याची कहाणी आवडते ते थांबतात तर ज्याना आवडत नाही ते निघून जातात. फॉरेस्टचा कुणालाही आग्रह नसतो की, लोकांनी त्याची कहाणी ऐकावी पण तरीही तो ऐकतो. या चित्रपटाचे संवाद सरळ आणि साधे आहेत. एका दृश्यात नायकाची आई तिच्या कँसर या आजाराबद्दल सांगताना म्हणते, “फॉरेस्ट, मी मरत आहे.” यावर नायक निरागसपणे विचारतो, “आई तु का मरत आहेस?” निरागस आणि साधेपणा हे चित्रपटाची सर्वात मोठी ताकद आहे. हा चित्रपट १९९४ ला रिलीज झाला होता, या चित्रपटाला पंचवीस वर्षे होऊन देखील आजही हा चिञपट प्रेरणादायी आणि संयुक्तिक वाटतो. लवकरच या चित्रपटाचा बॉलीवुडमध्ये रिमेक रिलीज होणार आहे.
(प्रा. शुध्दोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत.)