शुद्धोधन कांबळें
आंबेडकरी विचारांवर आधारित सामाजिक जाणिवा व समता या बाबींवर भर देणारे अनेक चित्रपट सध्या भारतात निर्माण होत आहेत. मराठी व तामिळ भाषामध्ये अशा चित्रपटांची संख्या सतत वाढत आहे. प्रेक्षकांना देखील असे चित्रपट पसंत येत आहेत. नुकताच आलेला जयभीम चित्रपट पूर्ण देशात धूमाकूळ घालत आहे. मराठीमध्ये फँड्री, ख्वाडा यासारख्या चित्रपटाने आपली मने जिंकली. अशाच विचाराचा आणि विदर्भातील लोकांनी तयार केलेला विदर्भातील मातीतील ‘जयंती’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातून महापुरुषाच्या जयंती निमित्त नुसते डीजेवर नाचण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करुन तरूणांनी योग्य दिशा प्राप्त करावी असा महत्त्वाचा संदेश हा चित्रपट देतो.
दोन महापुरुषांचे सच्चे अनुयायी कधीच एकमेकांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांचे पूर्ण विचार जर समजून घेतले तर आपल्याला लक्षात येईल की ते कुठल्याही एका समाजा वा जातीपुरते मर्यादित नव्हते. ग्रामीण भागात पसरलेले जातीयतेचे विष आणि त्यातून होणारे राजकारण यावर हा चित्रपट मार्मिक भाष्य करतो. चित्रपटाचा नायक ज्याप्रमाणे बदलत जातो त्याप्रमाणेच आपण चित्रपट पाहून बदलतो. आपली जंयती साजरी करण्याची पद्धत आणि उद्देश नक्कीच या चित्रपटाने बदलतो. अशा गंभीर विषयाला हात घातल्यामुळे या चित्रपटाचे करावे तितके कौतूक कमी आहे.
अमरावतीमध्ये हा चित्रपट इच्छा असूनही अनेकांना पहाता आला नाही कारण याकालावधीत आपल्याकडे दंगल झाली होती. सामाजिक मीडीयातील प्रसिद्धी व इतर ठिकाणी मिळणारा प्रतिसाद यामुळे अमरावतीमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक लोक उत्सूक आहेत. यासाठी शहारातील सरोज थिएटरमध्ये शनिवार व रविवारी , दि. २७ व २८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तरी सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पहावा.