शुध्दोधन कांबळे
सध्या रशिया- युक्रेन युध्द चालू आहे. ते जागतिक पातळीवर शक्ती सिध्द करण्यासाठी. जरी अमेरिका युध्दात प्रत्यक्ष सहभागी नसला तरी (अमेरिका प्रत्यक्ष युध्दात कधीच उतरत नाही आणि स्वतःच्या भुमीवर युध्द होऊ देत नाही, असो) नाटोच्या माध्यमातून युरोपातील वर्चस्व रशियाच्या सीमेवर नेण्यासाठीचा अमेरिकेचा अटाहस आणि ते नाकारण्यासाठी रशियाने सर्व विरोध पत्करुन केलेला हल्ला. यामुळे आपण अणुबॉम्ब हल्ला , तिसरे महायुध्द, यासारख्या भीतीच्या सावटाखाली वावरत आहोत.
जेमतेम कोरोनाने पाठ सोडली (खर तर नाक सोडलं म्हणायला पाहिजे, मास्कमुळे) आणि जगात महाशक्ती बनण्यासाठी जगाची सुरक्षितता आणि शांततेला तारण ठेऊन युध्द सुरु झाले. तस बघितले तर रशिया-युक्रेनमध्ये युध्द होणे यात नवीन काही नाही. रशियाच्या विभागणीपासून या दोन देशात सतत हल्ले -प्रतिहल्ले होत असतात. पण यावेळेसारखी गंभीर परिस्थिती यापूर्वी कधी निर्माण झाली नव्हती. सामान्य माणूस जेव्हा जात-धर्म यामध्ये अडकून असताना या दोन देशातील युध्दामुळे जात, धर्म, भाषा इत्यादी सारखे असले तरी राजकीय, भौगोलिक , व्यापार ,इत्यादी गोष्टीच जागतिक पातळीवर जास्त महत्वाच्या असल्याचे अधोरेखित झाले. रशिया आणि युक्रेन कधी काळी एकसंघ होते. धर्म , भाषा आणि संस्कृती यामध्ये एकसमानता असतानाही हे युध्द दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात जास्त विनाश घडवित आहे. एवढेच नाही तर या युध्दात नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचे नाव ही समान आहे ‘व्लादिमेर’, तरीही युध्द सुरुच आहे.
व्लादिमीर हे नाव मला सॅम्युअल बकेटच्या ‘वेटीग फॉर गोदो’तील एका पाञाची आठवण करुन देते. ब्सर्ड थिएटरची सुरवात करणारे हे नाटक मानवी अस्तित्व आणि जीवनातीला अॅब्सरडीटी यावर माफक शब्दात आणि माफक दृश्यात परिणामकारक भाष्य करते. रशिया – युक्रेन युध्दाचा शेवट कसा आणि काय होईल हे येणार काळच ठरवेल पण आज आपण जगातील समस्त मानव प्राणी ‘वेटीग फॉर गोदो’ मधील एस्ट्रॉजन आणि व्लादिमिर सारखे ट्रॅम्पस झाल्यासारखे वाटते. ते दोघे गोदोच्या मृगजळामागे धावतात तसे आपण सर्व या एका धर्माचे राज्य आले की ‘अच्छे दिन’ येतील किंवा आपल्या जातीचा नेता मंञी बनला की आपले सर्व प्रश्न सुटतील, अशा अनेक मृगजळांमागे धावून ‘इमोशनल फुल’ बनतो. एका जातीचे वा एका धर्माचे सर्व एकत्र आले तरी त्यामध्ये पण कोण व्यक्ती, समुह वा गट श्रेष्ठ हा प्रश्न निर्माण होतोच. शेवटी, शक्तीच असते महान, बाकी गप्पा उगाच!
(प्रा. शुध्दोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत.)