मुक्तपीठ टीम
पुणे म्हटलं की नानाविध उपक्रमांचं, कल्पनांचं शहर. त्या शहरातील गप्पांचे फड रंगवणारे कट्ट्यांचे उपक्रम हे रसिकांची दाद मिळवतात. आता पुण्यात गप्पा रंगवण्यासाठी आणखी एक कट्टा सुरु झाला आहे. नॉलेज कट्टा या नावाने सुरु झालेल्या या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अशाच गप्पा रंगल्या. “सध्या सगळीकडे विसंवाद, विद्वेष आणि विखार पसरवण्याची स्पर्धा सुरू आहे. संवादाची सगळी साधने दूषित करण्याची पुरेपूर व्यवस्था केली आहे. माध्यमेही विसंवादाचीच भूमिका बजावत आहेत. कट्ट्यावरील संवाद हा बोलका, मोकळा असतो. त्यामुळे अशा या विसंवादी आणि ‘कट्टी’च्या काळात ‘कट्टा’ टिकला तरच संवाद टिकेल,” असे मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केले.
शुभ ॲडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘नॉलेज कट्टा’ या उपक्रमाचे उद्घाटन आवटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण हे या कट्ट्याच्या पहिल्या भागाचे अतिथी म्हणून उपस्थित होते. शुभ ॲडव्हर्टायझिंगचे संचालक अमोल जगदाळे, प्रमोद जगदाळे आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील सृजनशील व्यक्तींशी अनौपचारिक संवादासाठीचे व्यासपीठ म्हणून या कट्ट्याचा वापर करण्यात येणार आहे.
संजय आवटे म्हणाले, “संवाद ही काळाची गरज आहे. आपल्याला एकमेकांशी उत्तम भांडता येणेही गरजेचे आहे. सकस विनोदही करता यायला पाहिजे. परंतु कितीही भांडण झाले तरी संवाद कायम राहिला पाहिजे. अशा कट्ट्यांमुळे मनमोकळा, अनौपचारिक संवाद स्थापित व्हायला मदत होईल.”
ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या गझलांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘एकटाच मी उदास आज आठवी तुला, कोणत्या पथी कळे न शोधलेस तू मला’, या गझलेने प्रेम आणि विरहाच्या डोहात श्रोत्यांना डुंबवले तर ‘या जगण्याचा शौक लागला, यातच आहे गोडी, दारूड्यांनी मला पाजली दुनिया थोडीथोडी’ या गझलेतून मभांनी जीवनाच्या नव्याच आयामाचे दर्शन घडवले.
अमोल जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद जगदाळे, वेद जोशी, पूजा राजपाठक, मयूर फुलपगारे, दीपाली इंगवले आणि टीमने संयोजन केले. डॉ. भालचंद्र सुपेकर यांच्या साजेशा सूत्रसंचालनाने कट्ट्याच्या मैफलीत रंगत आणली.