अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
नारायण राणेंच्या घरावरील मोर्च्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर तशीच सळसळती आक्रमक शिवसेना दिसली. मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेना ज्या स्टायलीसाठी ओळखली जाते ती शिवसेना स्टायलीत शिवसैनिक आक्रमकतेने सरसावताना दिसले. अमरावतीतील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीत हनुमान चालिसा पठनाचा इशारा दिल्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यांना स्वत:च्या घरातूनच बाहेर पडू दिले नाही. सत्तेवर असल्याने थंडावलेली शिवसेना पुन्हा सळसळत आहे. त्यामुळे एकप्रकारे राणागिरी ही शिवसेनेच्या फायद्याचीच ठरल्याचं दिसत आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहोचू, असे सांगितले होते. त्यामुळे शुक्रवारपासून मुंबईत राणांविरुद्ध शिवसेना आक्रमक झाली आहे. शुक्रवारपासून शिवसैनिक मातोश्रीवर ठिय्या मांडून बसले आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.
तेजस ठाकरेंकडून शिवसैनिकांची विचारपूस…
- ठाकरे कुटुंबातील व्यक्तींची भेट ही शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारी ठरू शकते.
- मातोश्रीबाहेर रात्रभर अनेक शिवसैनिक ठिय्या मांडून होते.
- मध्यरात्रीच्या सुमारास तेजस ठाकरे अचानक मातोश्रीबाहेर आले आणि त्यांनी थेट शिवसैनिकांची विचारपूस केली.
- तेजस ठाकरे काही काळ याठिकाणी खुर्ची घेऊन बसले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी मोकळेपणाने संवाद साधला.
- शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील ‘मातोश्री’वर प्रवेश करताना शिवसैनिकांशी थोडा वेळ का होईना पण संवाद साधला होता.
- या सगळ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवी उर्जा आली आहे.
शिवसैनिकांकडून गुंडगिरी रवी राणांचा आरोप…
- दरम्यान, राणा दाम्पत्याने आपण शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहोचू, असे सांगितले होते.
- मात्र अद्याप ते मातोश्रीवर पोहोचलेले नाही. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे.
- आमच्या घरावर हल्ला होतोय तरी आम्ही मातोश्रीवर जाणाराच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले.
- हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही.
- महाराष्ट्र कुठे चालला आहे.
- महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहे.
- आम्हाला कोणी रोखू नये असे रवी राणा म्हणाले.