मुक्तपीठ टीम
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी या तीन पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये संघर्ष होत असतो. यावेळी साताऱ्यात शिवसेनेचे आजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आमनेसामने आले आहेत. याचे कारण आहे रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. दोन दिवसांपूर्वी आमदार महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्था आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर संतापत माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी, “त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून नाहक बदनामी करू नका. अन्यथा, तुमचे स्वतःचे राजकारण संपेल, असा इशारा दिला आहे.
आ. महेश शिंदेंचे ‘रयत’ कारभारावर गंभीर आरोप
- दोन दिवसांपूर्वी काटकरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात महेश शिंदे यांनी ‘रयत’च्या कामकाजावर टीका केली. रयत शिक्षण संस्था ही आमच्या हक्काची संस्था असूनही गेल्या सात वर्षांत जिल्ह्यातील एकाही तरुणाला या संस्थेत रोजगार मिळालेला नाही.
- काही नेते ‘रयत’मध्ये संचालक म्हणून जातात आणि जिल्ह्यातील एकाही युवकाला नोकरी लागत नाही.
- त्याला नोकरी लागायला चाळीस-चाळीस लाख रुपये मागितले जातात, ही मोठी शोकांतिका आहे, असे नाव न घेता शशिकांत शिंदे यांच्यावर टिका केली.
- तसेच रयत शिक्षण संस्था सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पैशातून उभी राहिलेली आहे.
- या संस्थेचा कारभार मुख्यमंत्र्यांच्या हातात येऊन ती पुन्हा सर्वसामान्यांची झाली पाहिजे.
माजी आमदार शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी पलटवार करत शरद पवारांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी, असा सल्ला दिला.
- चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून नाहक बदनामी करू नका.
- अन्यथा, तुमचे स्वतःचे राजकारण संपेल, असा इशाराही दिला.
- संगणकापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत अनेक प्रकल्प शरद पवारच अध्यक्ष झाल्यापासून या संस्थेत सुरु केले आहेत.
- शासकीय अनुदान व्यतिरिक्त निधी उभा करण्याची किमया या महाराष्ट्रात त्यांच्याच माध्यमातून झाले आहे.
- अनेक लोक इतर संस्थेचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचे योगदान आणि शरद पवार यांचे रयत मधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी.
- आपण किती बोलतो याचे भान ठेवावे.