मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात जाऊन थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले. गेले काही दिवस खेड आणि आजूबाजूच्या भागात पुण्यात जे घडतंय ते योग्य नाही. अख्ख्या महाराष्ट्रात चांगले चाललेले असताना, अजित पवारांचेही ऐकले जात नसेल, तर पुणे जिल्ह्यात असं चालत असेल तर पुणे जिल्ह्यापुरतं काय करायचे ते पाहू. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते जर स्थानिक शिवसैनिकांना त्रास देत असतील, तर आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत.
खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते पोलिसांना हाताशी धरून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्रास देत असतील. बुरखे घालून त्यांची परेड काढणार असतील तर योग्य नाही, असे बजावले. तसेच खेडमधील शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेना आहे, याची जाण ठेवा, असा इशारा देतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच खेडमधील घटनाक्रमाची गंभीर दखल घेतली आहे, असेही सांगितले. तसेच त्यांनीच मला खेडमध्ये पाठवल्याचेही राऊत यांनी उघड केले. राऊत यांनी खेडमध्ये ठिणगी पडली आहे, असंही म्हटले.
खेड मतदारसंघातील आधीचे आमदार दिवंग सुरेश गोरे यांनी पंचायत समितीसाठी एक इमारत नक्की केली होती. त्यांचा आत्मा त्या प्रकल्पात गुंतला होता. एका पंचायत समितीच्या जागेवरून सध्याचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते जर घाणेरडे राजकारण करतात. त्याला माज आला असेच म्हणतात. अशा पद्धतीचा माज जर कोणाला वाटत असेल, तर शिवसेना आहे!
दुसरा जो प्रकार घडला तो अविश्वास ठराव मंजूर करताना जो तमाशा करण्यात आला, तो आघाडीच्या कोणत्या नितीनियमात बसते? आम्ही शरद पवारांपर्यंत जाऊ. त्यानंतर आम्ही आम्हाला जे करायचे ते करु.
पंचायत समितीचा विषय आम्ही आमच्यासाठी खूप प्रतिष्ठेचा केला आहे. आम्हालाही माणसं फोडता येतात. आमदार दिलीप मोहिते यांची वागण्याची पद्धत अशीच असेल तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी असेल नसेल पण पुढच्यावेळी खेड मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असणार म्हणजे असणारच. आणि येथे शिवसेनेचाच आमदार निवडून येईल, याचीही काळजी घेऊ, असेही खासदार संजय राऊत यांनी बजावले.
पुण्याच्या खेडमध्ये घाणेरडे राजकारण
- संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कारभार योग्यरित्या सुरु असताना खेडमध्ये घाणेरडं राजकारण सुरु आहे.
- जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही.
- त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील.
- पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना करावा, नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा.
- खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली आहे.
- पंचायत समितीच्या जागेवरुन हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल.
- थोडीफार सत्ता आहे, म्हणून माज करु नका, शिवसेना उत्तर देईल.
- पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेलं, दहशतीने पळवून नेलं.
- त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत हा विषय नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे.
- आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही ते करणार नाही.
- बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा, आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचं हे आम्ही पाहू.
- दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर महाविकास आघाडी असो की नसो, इथे शिवसेनेचा उमेदवार असेल, आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येईल.