मुक्तपीठ टीम
राम मंदिरासाठी घेतलेल्या जमीन खरेदीत गैरव्यवहार करण्यात आल्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. याप्रकरणी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे चिडलेल्या भाजपा युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. मात्र, भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तिथे दाखल झाले. आक्रमक झालेले शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. आजच्या संघर्षासाठी मुद्दा राम मंदिर जमीन घोटाळ्यांच्या आरोपाचा, स्थान शिवसेनाभवन परिसराचे असले तरी खरा हेतू हा मुंबई मनपाच्या २०२२च्या निवडणुकीसाठीच्या तयारीचा आहे, असे सांगितले जात आहेत.
भाजपाच्या संतापाचे कारण काय?
- भाजपाच्या संतापाचे कारण याहीवेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत हेच आहेत.
- त्यांनी मंगळवारी राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळ्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, आपचे खासदार संजय सिंह यांनी अयोध्येतील जमीन गैरव्यवहाराची माहिती दिली.
- राम मंदिरासाठी मिळालेल्या दानाच्या पैशाचा दुरुपयोग होत असेल तर लोकांच्या श्रद्धेला काही अर्थ राहणार नाही.
- श्रीराम जन्म भूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये सर्व भाजपाचीच लोक आहेत.
- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट करावं की आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही.
शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून भाजप युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवनासमोर जमले. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याची चिन्ह दिसत होती. त्यामुळे सेना भवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी ‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये कोंबले. त्याचवेळी काही भाजपा कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केली आहे.
मुक्तपीठ विश्लेषण – रस्त्यावर संघर्ष, भाजपाचं मिशन २०२२!
- आज मुंबईच्या रस्त्यावर झालेला हा संघर्ष मुंबई मनपाच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांची नांदी मानला जात आहे. २०१७मध्ये भाजपाला यशाने हुलकावणी दिली होती.
- यावेळी काहीही करून भाजपाला शिवसेनेला मुंबईच्या सत्तेपासून वंचित करायचे आहे.
- तर दुसरीकडे राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेला बालेकिल्ला असलेल्या राजधानीला आपल्याच ताब्यात ठेवायचे आहे.
- भाजपाने मनपाच्या कारभाराला लक्ष्य करत आक्रमक मोहीम उघडली आहे.
- त्यात राम मंदिर जमीन घोटाळ्याचा आरोप हा जिव्हारी लागणारा असल्याने त्याची दखल घेणे भाग होतेच, पण त्यावर मुंबईत थेट शिवसेनाभवनसमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न करण्यामागे मुंबईकरांमध्ये त्यातही अमराठी मतदारांमध्ये शिवसेनेच्याविरोधात आम्हीच असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असावा, असे मानले जाते.
- शिवसेनेसोबत सत्तेत असणारी काँग्रेस ही भाजपासारखीच अमराठी मुंबईकरांच्या मतांमधील मोठी वाटेकरी असते.
- काँग्रेसची गेल्या काही दिवसात मुंबई पातळीवर शिवसेनेविरोधात वाढलेली आक्रमकता आघाडी धर्म म्हणून वरकरणी खटकणारी वाटू शकते.
- पण प्रत्यक्षात अमराठी मतदारांमध्ये शिवसेनेची विरोधक म्हणून काँग्रेसची प्रतिमा तयार करणारी ठरू शकते.
- त्यामुळेच आपणच जास्त आक्रमक आहोत, शिवसेनेला थेट बालेकिल्ल्यात शिवसेनाभवन परिसरात आव्हान देऊ शकतो, असं दाखवण्याची भाजपाची रणनीती असावी.
शिवसैनिकांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी माहिम पोलीस ठाण्यात जाऊन शिवसैनिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यासोबत भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रसाद लोढोही होते.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या जमिनीचा वाद आहे तरी काय?
- अयोध्येत सध्या श्री राम मंदिर उभारणीचे काम सुरु आहे.
- त्यासाठी सभोतालच्या परिसरातील जमीन विकत घेण्याचे काम सुरु आहे.
- दोन कोटींची जमीन अवघ्या दहा मिनिटांमध्ये राम मंदिरासाठी वीस कोटींना विकत घेण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप समाजवादी पार्टी आणि आपने केला.
- आरोप करणारे आपचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर हल्ला झाला.
- त्यानंतर राम मंदिर न्यासाने असा घोटाळा झाला नसल्याचा खुलासा केला.
- शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले.
- त्यामुळे भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी संताप व्यक्त केला
- तेव्हापासूनच भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.
- त्याचेच पडसाद आज रस्त्यावरील संघर्षातून उमटले.